"भाजपा माझ्याविरोधात षडयंत्र रचतेय, माझी हत्या करू पाहतेय"; राकेश टिकैत यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 03:02 PM2022-06-04T15:02:34+5:302022-06-04T15:06:15+5:30
Rakesh Tikait And BJP : कर्नाटकात माझ्यावर हल्ला झाला, मी हात पुढे केला. जर मी हात पुढे केला नसता तर हल्लेखोराने माझ्या डोक्यात वार केला असता असं टिकैत यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठं विधान केलं आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना राकेश टिकैत (Rakesh Tikait) म्हणाले की, भाजपा माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहे आणि माझी हत्या करू पाहत आहेत. भाजपाचे नेतृत्व अशा कृत्यांमध्ये गुंतले आहे, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. कर्नाटकात हल्ल्याचा कट रचला गेला, ज्यात माझा जीव जाऊ शकला असता असंही सांगितलं. याच दरम्यान राकेश टिकैत यांनी बंगळुरू येथील शाई प्रकरणावरही भाष्य केलं आहे. माझ्यासोबत जे घडलं ते भाजपाचे षडयंत्र आहे असं म्हटलं.
भाजपा सरकारला माझी हत्या करायची आहे, असेही ते म्हणाले. कर्नाटकात माझ्यावर हल्ला झाला, मी हात पुढे केला. जर मी हात पुढे केला नसता तर हल्लेखोराने माझ्या डोक्यात वार केला असता असं टिकैत यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्यावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कायदा आपलं काम करेल. भारतीय किसान युनियन (BKU) चे नेते आणि शेतकरी आंदोलनाचा मोठा चेहरा राकेश टिकैत यांच्यावर काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये हल्ला झाला होता. एका व्यक्तीने त्यांच्या तोंडावर शाई फेकली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पत्रकार परिषद सुरू असतानाच तेथे उपस्थित लोकांमध्ये वादावादी सुरू झाली. यावेळी एका व्यक्तीने शेतकरी नेत्यांवर शाई फेकली. यानंतर तिथे उपस्थित लोकांमध्ये तुफान हाणामारी आणि खुर्च्यांची फेकाफेक झाली. पत्रकार परिषद सभागृहात गोंधळ घालणाऱ्या आणि राकेश टिकैत यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या काही जणांना तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले होते. एका स्थानिक वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओवरून दोन्ही शेतकरी नेते स्पष्टीकरण देण्यासाठी आले होते.