मेरठमध्ये भाजपा आमदार संगीत सोम यांच्या घरावर गोळीबार, हँड ग्रेनेडनं हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 08:57 AM2018-09-27T08:57:55+5:302018-09-27T09:02:52+5:30
भाजपा आमदार संगीत सोम यांच्या घरावर गोळीबार आणि हँड ग्रेनेडचा हल्ला करण्यात आला आहे.
मेरठ- भाजपा आमदार संगीत सोम यांच्या घरावर गोळीबार आणि हँड ग्रेनेडचा हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात बंदुकधा-यानं संगीत सोम यांच्या घरावर गोळीबार करत जाता जाता हँड ग्रेनेडनं हल्ला केला. बुधवारी मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली आहे. हल्ला झाला तेव्हा आमदार संगीत सोम हे स्वतःच्या घरीच झोपलेले होते.
विशेष म्हणजे हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या घराच्या गेटवर गार्ड तैनात होते. गार्डच्या माहितीनुसार, एक स्विफ्ट कार गेटवर थांबली, काळे कपडे घातलेला एक शस्त्रास्त्रधारी गाडीतून उतरला आणि त्यानं गोळीबाराला सुरुवात केली. गार्ड त्याच्यावर धावून गेल्यानंतर त्यानं ग्रेनेड फेकून पळ काढला. ग्रेनेड घराबाहेरील एका कारच्या खाली पडला. परंतु सुदैवानं ग्रेनेडचा स्फोट झाला नाही.
मेरठच्या एसएसपी यांनी सांगितलं की, रात्री 12.45 वाजता हल्ला झाल्याची सुरक्षारक्षकानं माहिती दिली आहे. आम्हाला घटनास्थळावरून गोळ्यांचे बॉक्स मिळाले. फॉरेन्सिक टीम याचा तपास करत आहे. घटनास्थळी एक हँड ग्रेनेडही मिळालं. तो फुटलेला नव्हता. हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. गार्डची केबिन आणि मुख्य गेटला निशाण्यावर ठेवून गोळीबार करण्यात आला. आम्ही सीसीटीव्ही फुटेजचा तपास करतोय. दुसरीकडे संगीत सोम म्हणाले, मला कोणतीही धमकी मिळालेली नाही. परंतु हा दोन वर्षांपूर्वी एक फोन आला होता. ज्यात ग्रेनेडनं मारण्याची धमकी देण्यात आली होती. सध्या तरी घटनास्थळ पोलीस दाखल झाले असून, तपास करत आहेत. भाजपा आमदाराच्या घरावर झालेल्या हल्ल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आमदार संगीत सोम हे 2013च्या मुजफ्फरनगर दंगलीदरम्यानही चर्चेत आले होते.