मेरठच्या मेडिकल कॉलेजमधील प्रताप; मृतदेहाचे 10 वेळा एक्स रे काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 09:47 PM2019-06-25T21:47:45+5:302019-06-25T21:57:47+5:30
जागृती विहार सेक्टरमध्ये एका व्यक्तीने वेगाने कार चालवत अनेक वाहनांना ठोकले होते.
मेरठच्या एलएलआरएम मेडिकल कॉलेजमध्ये भलेही रुग्णांला एक्स रे काढण्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागत असले तरीही एका मृतदेहाचे 10 वेळा एक्स रे काढण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कॉलेजच्या प्राचार्यांनी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह 11 जणांकडून उत्तर मागितले आहे.
हा प्रकार 20 जूनचा आहे. जागृती विहार सेक्टरमध्ये एका व्यक्तीने वेगाने कार चालवत अनेक वाहनांना ठोकले होते. यामध्ये एक रिक्षाचालक जखमी झाला होता. या रिक्षाचालकाचा मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू झाला. याच रिक्षाचालकाच्या मृतदेहाचे एक्सरे काढण्यात आले आहेत. मेल्यानंतरही एक्सरे काढण्याची सूचना मिळाल्याने आपत्कालीन विभागात खळबळ माजली होती. याबाबत रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ सुभाष यांनी प्राचार्य आर सी गुप्ता यांना कळविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
प्राचार्यांनी हा प्रकार गंभीरतेने घेतल्याने त्यांनी 11 जणांना कारणे दाखवा नोटीस पाठविली. हे प्रकरण तीन दिवस दाबून ठेवण्यात आले होते. मात्र, उत्तर आल्यानंतर दबक्या आवाजात कुजबूज सुरू झाली आणि प्रकरणाला वाचा फुटली.
गुप्ता यांनी सांगितले की, रिक्षाचालकावर कनिष्ठ डॉक्टरने पहिले उपचार केले होते. त्याच्या शरीरावर जखमा आणि फ्रॅक्चर होते. मी ही या प्रकरणाची चौकशी केली आहे. रिक्षा चालकाच्या मृत्यूनंतर हे एक्सरे काढण्यात आले आहेत. डॉक्टरांचा हेतू वाईट नव्हता. रिक्षा चालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे त्यांना जाणून घ्यायचे होते. दोन विभागांची मते वेगवेगळी आल्याने त्यांनी या मृतदेहाचे एक्सरे काढले. मात्र, त्यांना हे करण्याआधी माझ्याकडे येणे आवश्यक होते. यामुळे हे प्रकरण गंभीरतेने घेण्यात आले आहे.