"कंगना राणौतने माफी मागावी आणि तिला अटक करावी"; शेतकऱ्यांचा पोलीस ठाण्याला घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:35 AM2024-09-05T11:35:28+5:302024-09-05T11:42:52+5:30
Kangana Ranaut And Farmers Protest : कंगना राणौतने शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाने सर्वच जण संतापले आहेत. यानंतर शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या असून सातत्याने आंदोलन करत आहेत.
भाजपा खासदार कंगना राणौतने शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाने सर्वच जण संतापले आहेत. यानंतर शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या असून सातत्याने आंदोलन करत आहेत. मेरठमध्ये भारतीय किसान युनियन किसान क्रांती संघटनेच्या बॅनरखाली शेकडो शेतकऱ्यांनी कंकरखेडा पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि घोषणाबाजी केली. यावेळी कंगना राणौतच्या अटकेची मागणी करण्यात आली असून ती पूर्ण न झाल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय किसान युनियन किसान क्रांतीचे राष्ट्रीय अध्यक्ष विपिन मलिक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर-ट्रॉलीसह कंकरखेडा पोलीस ठाणं गाठलं. शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर ट्रॅक्टर-ट्रॉली उभ्या करून रास्ता रोको केला. ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे मुख्य रस्त्याही जाम झाला होता. शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात घुसून गोंधळ घातला, तर उर्वरित शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीवर बसून राहिले.
काही शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात घोषणाबाजी सुरू केली. कंगना राणौतच्या अटकेसाठी घोषणाबाजी करण्यात आली. कंगना रणौतच्या विरोधात सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे आणि तिच्या अटकेची मागणीही करत आहेत. विपिन मलिक म्हणाले की, कंगना राणौतने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं आणि त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तिने शेतकऱ्यांची माफी मागावी आणि कंगनाला लवकर अटक करावी.
शेतकऱ्यांनी कंकरखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी योगेश शर्मा यांच्याशी चर्चा केली आहे. कंगना राणौतवर गुन्हा दाखल झाल्यावरच आज घरी जाऊ, अन्यथा ट्रॅक्टर ट्रॉलीही पोलीस स्टेशनच्या आत आणि बाहेर उभे राहू असं शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. कंगनाच्या विधानाने शेतकरी खूप संतप्त झाले असून आपला राग व्यक्त करत आहेत.