'एचआर मॅनेजर' ठरला देवदूत! लॉकडाऊनमध्ये गरीबांना केली ५२ लाखांची मदत
By मोरेश्वर येरम | Published: December 24, 2020 12:02 PM2020-12-24T12:02:08+5:302020-12-24T12:06:07+5:30
डोसपती रामू हा एका खासगी कंपनीत 'एचआर मॅनेजर' पदावर कार्यरत आहे.
हैदराबाद
गेल्या काही महिन्यांपासून हैदराबादचा ४३ वर्षीय डोसपती रामू हा गरीबांसाठी देवदूत ठरला आहे. डोसपती यानं लॉकडाऊन काळात आतापर्यंत स्वत:च्या पाकिटातून तब्बल ५२ लाख रुपयांची मदत केली आहे.
डोसपती रामू हा एका खासगी कंपनीत 'एचआर मॅनेजर' पदावर कार्यरत आहे. त्यानं लॉकडाऊनमध्ये गरीबांना मदत करण्यासाठी स्वत:चं पीएफ खातं, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं रिकामी केलं. इतकंच नव्हे, तर नालागोंडा येथील जमीन देखील त्यानं विकली. डोसपती यानं त्याची पत्नी आणि दोन मुलांसह मोठ्या फ्लॅटमध्ये जाण्याचं स्वप्न देखील पणाला लावलं आहे. डोसपतीच्या या दानशूरपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
डोसपतीनं नेमकं काय केलं?
डोसपती यानं लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी चोवीसतास 'Rice ATM'ची संकल्पना राबवली. या संकल्पनेला १९ डिसेंबर रोजी २५० दिवस पूर्ण झाले आहेत. या माध्यमातून गरीबांना मोफत तांदूळ देण्याचं काम डोसपती यानं केलं आहे.
"लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजचं जेवण देखील मिळणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे समाजाप्रती काहीतरी करण्याची जाणीव निर्माण झाली आणि यातूनच सारं पुढे घडत गेलं. मला फक्त तांदळाची मदत करायची नव्हती. कारण त्यावेळी गरीबांना औषधं, दूध, भाज्या अशी इतर वस्तूंचीही गरज होती. यासर्व गोष्टी माझ्या क्रेडीट कार्डमधून मिळवणं शक्य नव्हतं. मी माझ्या कंपनीत गेल्या १६ वर्षांपासून काम करत असल्यानं पीएफमधून मला ५ लाख रुपये काढता आले. यातून मी इतर सर्व गोष्टी विकत घेऊ शकलो आणि लोकांपर्यंत पोहोचवू शकलो", असं डोसपती अगदी प्रांजळपणे सांगतो.
डोसपती याची पत्नी एका शाळेत शिक्षिका असून त्यानं केलेल्या कामाचं श्रेय तो आपल्या पत्नीला देतो. पत्नी माझ्यामागे खंबीरपणे उभी राहिली म्हणून मी हे करु शकलो, असं तो सांगतो.
डोसपती रामू याचा त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या पाच महिन्यांपूर्वी दुचाकीवरुन अपघात झाला होता. त्यातून तो बचावला आणि आपल्याला मिळालेल्या नव्या आयुष्यात गरीबांची मदत करण्याचं त्यानं ठरवलं. आपल्या मासिक वेतनामधून एकूण ७० टक्के रक्कम गरजूंच्या मदतीसाठी वापरायची असं त्यानं ठरवलं होतं.
अपघातातून सावरल्यानंतर त्यानं अनेक जागरुकता मोहीमेतही सहभाग घेऊन हेल्मेट आणि सीटबेल्टचं महत्व पटवून देण्याचे प्रयत्न केले. इतकंच नाही, तर शहरात रहदारीच्या रस्त्यांवर जास्तीत जास्त सीसीटीव्ही बसविण्यासाठीही त्यानं पुढाकार घेतला आहे.