ओडिशाचा दशरथ मांझी, एकट्याने खोदला 3 किमी लांब कालवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 02:54 PM2018-06-22T14:54:34+5:302018-06-22T15:50:39+5:30
दशरथ मांझी यांना 100 मी लांबीचा रस्ता खोदण्यासाठी 22 वर्षे लागली होती. मात्र नायक यांनी 3 किमीचा कालवा खणण्याचे काम 3 वर्षांमध्ये पूर्ण केले आहे.
भूवनेश्वर- डोंगरामध्ये केवळ छिन्नी, हातोडीच्या साहाय्याने खोदून रस्ता काढणाऱ्या दशरथ मांझीचे उदाहरण तुम्ही ऐकले असेलच. दशरथ मांझी यांना 100 मी लांबीचा रस्ता खोदण्यासाठी 22 वर्षे लागली होती. असाच एक मांझी ओडिशामध्येसुद्धा आहे. या आदिवासी समुदायातील व्यक्तीने 3 किमी लांबीचा कालवाच खणून काढला आहे. ओडिशातील केओंझार जिल्ह्यात राहाणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे. दैतारी नायक. त्यांचं वय 75 वर्षे आहे. ओडिशातील गोनासिका पर्वतामधून तीन किमीचा कालवा काढून त्यांनी आपल्या 100 एकर शेतजमिनीसाठी पाण्याची सोय केली आहे. त्यांचे शेत तलवैतरणी नावाच्या खेडेगावात आहे.
75 years old Daitari Nayak carved out 3 km water channel on his own to ensure he could irrigate his 100 acres of lands in his village, was later joined by his 4 brothers & other villagers in digging it through Gonasika mountain in Keonjhar district, Odishahttps://t.co/hwGNpkEDMi
— TribalStuff (@TribalStuff) June 22, 2018
नायक यांनी 3 किमीचा कालवा खणण्याचे काम 3 वर्षांमध्ये पूर्ण केले आहे. या कामासाठी त्यांना त्यांचे भाऊ आणि गावकऱ्यांची मदत झाली होती. आता या कालव्यातील पाण्याने तांदूळ, मोहरी, मका अशी पिके घेत आहेत. केओंझारचे जिल्हाधिकारी आशिष ठाकरे यांनी दैतारी नायक यांच्या दृढनिश्चयाचं व कष्टांचं कौतुक केले आहे.
याच वर्षी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील आणखी एका व्यक्तीचं कर्तृत्त्व असंच समोर आलं होतं. जालंधर नायक नावाच्या व्यक्तीने त्यांचे गाव गुम्साही आणि फुलबनी यांना जोडणारा रस्ता तयार करण्यासाठी पहाड खोदून काढला. 45 वर्षांच्या या व्यक्तीन सलग दोन वर्षे रोज 8 तास काम करुन हा रस्ता तयार केला. आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होत होता म्हणून केवळ छिन्नी, हातोडीच्या साहाय्याने या माणसाने रस्ता खोदून काढला.