OMG! माणूस आहे, की चालतं फिरतं सोन्याचं दुकान? कोण आहे दीड कोटी रुपयांची ज्वेलरी घालणारा हा 'गोल्ड मॅन'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:11 AM2022-02-23T11:11:28+5:302022-02-23T11:13:00+5:30
खरे तर प्रेमसिंह यांचा सोन्याचे दागिने घालण्याचा हा छंद फार जुना आहे. प्रेमसिंह लहानपणापासूनच दागिने घालतात.
पाटणा - जगात असे अनेक लोक आहेत, जे त्यांच्या आगळ्या-वेगळ्या छंदामुळे ओळखले जातात. खरे तर, प्रत्येकालाच कोणता ना कोणता छंद अथवा आवड असते. यामुळे संबंधित व्यक्तीचे राहणीमानही इतरांपेक्षा काहीसे वेगळे असते. आम्ही आपल्याला ओळख करून देणार आहोत अशाच एका व्यक्तीची. हा व्यक्ती बिहारचा गोल्ड मॅन म्हणून ओळखला जातो. या गोल्ड मॅनचे नाव आहे प्रेम सिंह. प्रेम सिंह हे व्यवसायाने कंत्राटदार आहेत आणि ते आपल्या उत्पन्नाच्या एका भागातून सोन्याचे दागिने खरेदी करतात.
खरे तर प्रेम सिंह यांचा सोन्याचे दागिने घालण्याचा हा छंद फार जुना आहे. प्रेम सिंह लहानपणापासूनच दागिने घालतात. आता त्यांच्या अंगावर जवळपास दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिने असतात. यांत सोन्याच्या साखळीपासून ते ब्रेसलेटपर्यंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचा समावेश आहे.
इतर राज्यातील लोक, विशेष करून दक्षिण भारतातील लोक गोल्ड मॅन म्हणून ओळखले जातात हे समजल्यानंतर आपणही बिहारचा गोल्ड मन म्हणून का ओळखले जाऊ नये, असा विचार प्रेम सिंह यांच्या मनात आला. मग काय, त्यांनी एक-एक दागिना विकत घेण्यास सुरुवात केली. आता प्रेम सिंह जेव्हा रस्त्यावरून चालतात तेव्हा, ते एक ज्वेलरी शॉप असल्यासारखे दिसतात. आज बाजारात दीड किलो दागिन्यांची किंमत दीड कोटी रुपये एवढी आहे. प्रेमसिंग यांना स्वतःला बिहारी गोल्डमॅन म्हणवून घेण्यात अभिमान वाटतो. मूळचे भोजपूर जिल्ह्यातील कल्याणपूर पंचायतीच्या वासुदेवपूर गावचे रहिवासी असलेले प्रेमसिंग, गेल्या अनेक वर्षांपासून पाटण्यात राहतात.
एवढे दागिने घालून रस्त्यावर फिरता, भीती वाटत नाही का? असे विचारले असता, प्रेम सिंह बिहार सरकारच्या सुशासनाची तारीफ करतात. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये सुशासन आहे. यामुळे भीती वाटत नाही, असा त्यांचा दावा आहे. मात्र, 2021 मध्येच प्रेम सिंह यांना रात्रीच्या वेळी घरी परतत असताना काही गुंडांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले होते. पण पाटणा पोलिसांनी त्वरीत कारवाई करत त्यांचे सर्व दागिने जप्त केले आणि गुन्हेगारांना अटक केली.
महाराष्ट्राचे गोल्ड मॅन -
रमेश वांजळे -
महाराष्ट्रातही सोन्याच्या दागिन्यांचा छंद असलेली अनेक नावे आहेत, होती. अनेकांना गोल्ड मॅनही म्हटले जाते. पण महाराष्ट्रातील गोल्ड मॅन म्हटल्यानंतर दिवंगत आमदार रमेश वांजळे (Ramesh Wanjle) यांचे नाव लगेच समोर येते. वांजळे हे, मनसेच्या पहिल्याच विधानसभा निवडणूकीत निवडून आलेल्या 13 आमदारांपैकी एक होते. त्यांना गोल्डन मॅनही म्हटले जात होते. त्यांच्या अंगावर भरपूर सोने असायचे.
सनी वाघचौरे -
असेच एक नाव आहे सनी वाघचौरे. सनी आपल्या अंगावर मोठ्या प्रमाणावर सोने घालतात. यांच्याकडे गोल्ड फोन फोन आणि सोन्याचा बूट आहे. एवढेच नाही, तर सनीकडे असलेली ऑडी कारही गोल्ड प्लेटेड आहे.
दत्ता फुगे -
महाराष्ट्रात गोल्ड मॅन दत्ता फुगे हे नावही प्रसिद्ध होते. ते सोन्याचा शर्ट परिधान करत असल्याने चर्चेत आले होते. फुगे यांची 15 जुलै 2016 रोजी हत्या झाली होती.