शरद पवार यांच्या निवासस्थानी सर्व विरोधी नेत्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 05:40 AM2019-02-14T05:40:07+5:302019-02-14T05:40:16+5:30
विरोधी पक्षांच्या महाआघाडीतील मतभेद दूर व्हावेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी रात्री झालेल्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, फारुख अब्दुल्ला आदी नेत्यांची बैठक झाली.
नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या महाआघाडीतील मतभेद दूर व्हावेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी रात्री झालेल्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, फारुख अब्दुल्ला आदी नेत्यांची बैठक झाली. विरोधी पक्षांतील मतभेद दूर करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
आम आदमी पक्षातर्फे आज सकाळी जंतरमंतरवर ‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा या मागणीसाठी झालेल्या धरणे आंदोलनात राहुल गांधी वगळता वरील सर्वच नेते सहभागी झाले होते. याशिवाय माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, शरद यादव, सपाचे राम गोपाल यादव यांनीही धरणे आंदोलनात भाग घेतला. त्याचवेळी शरद पवार यांच्याकडे रात्री नेत्यांनी जमण्याचा निर्णय झाला. याची माहिती दिल्यानंतर राहुल गांधी यांनीही बैठकीत सहभागी होण्याचे ठरविले आणि त्यानुसार तेही पवार यांच्या निवासस्थानी आले.
ममता बॅनर्जी त्यानंतर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये गेल्या, तेव्हा यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी हास्यवदनाने त्यांचे स्वागत केले. पण तुमचे काँग्रेस कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये आपल्याला विरोध करतात, असे प्रत्युत्तर ममता यांनी त्यांना दिले. त्यावर राजकारण तर सुरूच राहील, पण मैत्री सोडून कसे चालेल, असे म्हणून सोनिया गांधी तिथून गेल्या. मात्र नंतर पत्रकारांंच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आमचा शत्रू आहे. पण दिल्लीत भाजपाच्या विरोधात आम्ही मित्र आहोत. आमचा राज्यात काँग्रेसशी असलेला विरोध कायम राहील.
जागावाटपाचा विषय नाही
त्याआधी जंतरमंतरवरील धरणे आंदोलनात बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपाविरोधात आम्ही सारे विरोधक एकत्र आहोत, याची ग्वाही दिली.
पण या धरणे आंदोलनात काँग्रेसचे केवळ आनंद शर्माच सहभागी होते.
त्यामुळे विरोधकांतील मतभेद दूर करण्यासाठीच पवार यांच्याकडे ही बैठक झाली. त्यात जागावाटप वा निवडणुकीशी थेट संबंधित विषय नव्हता.
मात्र विरोधकांच्या १0 शहरांत व्हावयाच्या महामेळाव्यांबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.