चांदोमामाशी आज गळाभेट! चंद्रयान-३चे आज 'सॉफ्ट लँडिंग'; ISRO घडविणार इतिहास!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 05:38 AM2023-08-23T05:38:26+5:302023-08-23T05:38:43+5:30
ऐतिहासिक क्षणाविषयी साऱ्या जगात प्रचंड उत्सुकता
बंगळुरू : लहानपणापासून ज्या चांदोमामाच्या गोष्टी, गाणी आपण ऐकत आलो, त्या चंद्राशी आता भारताची प्रत्यक्ष गळाभेट होण्याचा क्षण जवळ आला असून भारताचे ‘प्रग्यान’ (रोव्हर) आणि विक्रम (लँडर) हे दोघे बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. भारताच्या चंद्रयान-३च्या चंद्रावरील ऐतिहासिक लँडिंगकडे साऱ्या जगात विलक्षण उत्सुकता निर्माण झाली आहे. भारताच्या चंद्रमोहिमेला यश मिळू दे अशी सदिच्छा असंख्य लोक व्यक्त करत आहेत. या मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयानाचे लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरेल.
चंद्रयान-३वरील विक्रम लंँडर, प्रग्यान रोव्हर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील त्यावेळी प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटणार आहे. चंद्रयान मोहिमेद्वारे भारताने जे स्वप्न पाहिले त्याची पूर्तता उद्या होणार असून सगळेजण त्या क्षणाकडे डोळे लावून बसले आहेत. जर चंद्रयान-३मधील रोव्हरचे चंद्राच्या पृष्ठभागावर नीट लँडिंग झाले तर चंद्रावर अशा प्रकारची कामगिरी करण्याची क्षमता असलेला भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. यापूर्वी अशी भव्य कामगिरी अमेरिका, चीन, रशिया यांनीच करून दाखविली होती. (वृत्तसंस्था)
- रफ ब्रेकिंग फेज - २५x१३४ कि.मी. कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा ३० कि.मी. उंचीवर असेल तेव्हापासून ते उतरण्याच्या जागेकडे जाण्यासाठी चंद्राभोवती ७१३ किमी अंतर सरकत जाईल. त्याचा क्षितीज समांतर वेग १.६८ कि.मी. प्रति सेकंदवरून ०.२ कि.मी. प्रति सेकंद इतका कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील १२ पैकी ४ इंजिन वापरून यान ३० किमीउंची वरून ७.४२ किमी उंचीवर येईल. ६९० सेकंदांत हे होईल.
- अल्टिट्यूड होल्ड फेज - विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे टिपेल. भागाच्या छायाचित्रांशी तुलना करेल. हा टप्पा १० सेकंदांचा असेल. एवढ्या वेळेत ते आडव्याचे उभे केले जाईल. चंद्राभोवती ३.४८ किमी सरकेल आणि ७.४२ किमी उंचीवरून ते ६.८ किमी उंचीवर आणण्यात येईल. या काळात त्याचा वेगही कमी करण्यात येईल.
- फाइन ब्रेकिंग फेज - हा टप्पा १७५ सेकंदांचा आहे. या काळात हे यान २८.५२ किमी लँडिंगच्या जागेकडे सरकत जाईल. तसेच विक्रम लँडरची स्थिती यावेळी व्हर्टिकल असेल. त्याची उंची ६.८ किमीवरून चंदाच्या पृष्ठभागापासून ८०० ते १००० मीटर उंचीवर आणले जाईल. विक्रम लँडरचे सेन्सर सुरू करून पृष्ठभागाचे विश्लेषण केले जाईल. उतरण्यायोग्य जमीन तपासली जाईल. त्यासाठी विशेष कॅमेरा वापरला जाईल. जागा योग्य नसेल तर त्याच भागात १५० मीटर आजूबाजूस जागेचा शोध घेतला जाईल.
- टर्मिनल डिसेंट फेज - विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून १५० मीटर उंचीवर असेल. लँडरला सर्व गोष्टी सुरळीत आढळल्या तर विक्रम लँडर पुढच्या ७३ सेकंदांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि भारताचे स्वप्न पूर्ण होईल.
- लँडिंग : सायंकाळी ५:४५ पासून - १८ मिनिटांचा थरार. अत्यंत कठीण टप्पे, समजून घ्या सोप्या शब्दांत
- उतरण्याची वेळ - सायं. ६:०४ वा.
- कुठे उतरणार? - दक्षिण ध्रुवावर
- कसे करणार लँडिंग? - लँडिंग साइट तपासून निर्णय
- कुठे पाहता येईल? इस्रोच्या वेबसाइटवर - www.isro.gov.in/LIVE_telecast_of_Soft_landing.html
- अडचण आल्यास? - इस्रोकडे प्लॅन बी
इस्रोचा प्लॅन बी तयार; ...तर लँडिंग २७ ऑगस्टला
चंद्रयान-३मधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू असल्याबद्दल इस्रोकडून वारंवार तपासणी केली जात आहे. या यंत्रणा तसेच चंद्रावरील वातावरण या सर्व गोष्टींमध्ये अपेक्षेपेक्षा काही वेगळे बदल जाणवले तर इस्रोने चंद्रयान-३चे लँडिंग २३ ऑगस्टऐवजी २७ ऑगस्टला करण्याचा पर्यायही ठेवला आहे. यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतरही हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे इस्रोने म्हटले आहे.
लँडिंगनंतर काय होणार?
चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरल्यानंतर तो अधिक सक्रिय होईल. त्याचे रॅम्प उघडून त्यातून प्रग्यान रोव्हर चंद्रावर उतरेल. त्यानंतर विक्रम लँडर व प्रग्यान रोव्हर परस्परांची छायाचित्रे टिपणार असून ती पृथ्वीवर पाठवतील.
ज्यांनी दाखवले स्वप्न, त्यांच्या नावाचे ‘विक्रम’ चंद्रावर उतरणार
पं. जवाहरलाल नेहरू आणि संशोधक डॉ. विक्रम साराभाई यांच्या संकल्पनेतून भारत सरकारने अवकाश संशोधनासाठी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची १९६२ मध्ये स्थापना केली. त्यातूनच पुढे १५ ऑगस्ट १९६९ रोजी इस्रोची स्थापना झाली. तेव्हाचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न आज पूर्ण होईल.