काँग्रेस कार्य समितीची उद्या बैठक
By admin | Published: January 12, 2015 12:39 AM2015-01-12T00:39:16+5:302015-01-12T00:39:16+5:30
लोकसभा व अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँगे्रसमध्ये नवा प्राण फुंकण्याच्या प्रयत्नांतर्गत येत्या मंगळवारी काँग्रेस कार्यसमितीची (सीडब्ल्यूसी) बैठक होत आहे़
नवी दिल्ली : लोकसभा व अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँगे्रसमध्ये नवा प्राण फुंकण्याच्या प्रयत्नांतर्गत येत्या मंगळवारी काँग्रेस कार्यसमितीची (सीडब्ल्यूसी) बैठक होत आहे़ या बैठकीत पक्षाला गतवैभव परत मिळविण्याच्या उपाययोजनांवर चर्चा होणे अपेक्षित आहे़
या बैठकीत वादग्रस्त भूसंपादन वटहुकमासारख्या अनेक मुद्यांवर मोदी सरकारला घेरण्यासाठी एक कृती योजना तयार केली जाण्याची शक्यता आहे़ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल़ शेतकऱ्यांचा पाठिंबा पुन्हा मिळविण्यासाठी भूसंपादन वटहुकमाचा मुद्दा एक नामी संधी असल्याचे काँग्रेस मानत आहे़ अशा स्थितीत ही बैठक होत आहे़
लोकसभा आणि पाठोपाठ अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या मालिकेनंतर पक्षाचा जनाधार घसरू लागला आहे़ हे नैराश्य दूर सारून पक्षाला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांनी सर्व प्रदेशाध्यक्षांना दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे़ गतवर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरची काँग्रेस कार्य समितीची तशी दुसरी बैठक आहे़ यापूर्वी कार्यसमितीच्या एक-दोन बैठका झाल्या होत्या; मात्र त्या ए़ आऱ अंतुले तसेच अन्य काही पक्षनेत्यांच्या निधनावर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बोलाविण्यात आल्या होत्या़
(लोकमत न्यूज नेटवर्क)