डोवाल यांच्या निवासस्थानी बैठक; सलोखा राखण्याची धर्मगुरूंची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 04:22 AM2019-11-11T04:22:33+5:302019-11-11T04:23:42+5:30
रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात शांती व सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याची ग्वाही हिंदू व मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी रविवारी दिली.
नवी दिल्ली : रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात शांती व सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याची ग्वाही हिंदू व मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी रविवारी दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निवासस्थानी या धर्मगुरूंची एक बैठक पार पडली.
या बैठकीला शियापंथीय मौलाना कब्ले जवाद, स्वामी चिदानंद सरस्वती, बाबा रामदेव आदी धर्मगुरु उपस्थित होते. बाबा रामदेव यांनी सांगितले की, देशातील शांती, सलोखा कायम राखण्यावर या बैठकीत एकमत झाले. रामजन्मभूमी निकालाच्या निमित्ताने वातावरण तापविण्याचा व हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न देशातील व देशाबाहेरील काही अपप्रवृत्तींकडून होण्याची शक्यता आहे याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी हिंदूंना मुस्लिमांनी व मशीद बांधण्यासाठी मुस्लिमांना हिंदूंनी सहकार्य केले पाहिजे असेही आवाहन यावेळी करण्यात आले. स्वामी चिदानंद सरस्वती म्हणाले की, भले दोन समुदाय एकाच स्थळी एकत्रितरित्या प्रार्थना करू शकणार नाहीत, मात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी दोघांनी एकत्र यायलाच हवे. राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे आहे.
>मोदी सरकारचे केले कौतुक
मौलाना कल्बे जवाद यांनी सांगितले की, दोन्ही समुदायांच्या धर्मगुरूंच्या बैठकीत खेळीमेळीने चर्चा झाली. रामजन्मभूमी वादाचा संवेदनशील मुद्दा काळजीपूर्वक हाताळल्याबद्दल सर्वांनीच मोदी सरकारचे कौतुक केले.
या बैठकीनंतर एका संयुक्त निवेदनात या धर्मगुरुंनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल सर्वांनी मान्य केला आहे. राष्ट्रीय हित सर्वात महत्त्वाचे असून ते जपण्यासाठी प्रयत्नशील राहाण्यावर या बैठकीत एकमत झाले.
>निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना वाढीव सुरक्षा
नवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात ऐतिहासिक निकाल देणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांंसह पाच न्यायाधीशांच्या सुरक्षा व्यवस्थेत खबरदारीचा उपाय म्हणून वाढ करण्यात आली आहे.वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, कोणाही न्यायाधीशास धमकी आली म्हणून नव्हे तर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांनी शनिवारी सकाळी निकाल दिल्यानंतर लगेचच त्यांना वाढीव सुरक्षा लागू करण्यात आली आहे.आधी या न्यायाधीशांच्या निवासस्थानी स्थायी सुरक्षारक्षक होते. आता त्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. शिवाय निवासस्थानी जाण्याच्या रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात आले असून, न्यायाधीशांना मोबाईल एस्कॉर्टही पुरविण्यात आला आहे.