MCD निवडणुकांच्या एक्झिट पोलमुळे आप चिंताक्रांत, केजरीवालांनी बोलावली बैठक
By admin | Published: April 24, 2017 02:12 PM2017-04-24T14:12:11+5:302017-04-24T14:12:11+5:30
दिल्लीत तीनही महापालिकेत भाजपाची तिसऱ्यांदा सत्ता येणार असल्याचा कालच एक्झिट पोलमधून अंदाज वर्तवला गेला आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - दिल्लीत तीनही महापालिकेत भाजपाची तिसऱ्यांदा सत्ता येणार असल्याचा कालच एक्झिट पोलमधून अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे MCD निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावत असलेल्या आम आदमी पार्टीची धाकधुकी वाढली आहे. दिल्ली महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून दाखवण्यात आल्यानं आपच्या पायाखालची जमीनच सरकत चालली आहे. एक्झिट पोलमुळे आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवालांच्या चिंतेत भर पडली आहे.
दिल्लीतल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचा पराभव झाल्यानं आपचा असंतोष उफाळून आला आहे. त्यामुळे केजरीवालांनी MCD निवडणुकीत विजय संपादन करण्याची रणनीती आखण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच आज सकाळी आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे काही सदस्य अरविंद केजरीवालांच्या घरी गेले होते. त्यामुळे दिल्लीत सध्या निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. दिल्ली महापालिका निवडणुकांमुळे आम आदमी पार्टीचं येत्या काळातील भवितव्यही स्पष्ट होणार आहे. आम आदमी पार्टीचं प्राबल्य असलेल्या राज्यांमध्येही दिल्ली महापालिका निवडणुकीचे पडसाद उमटण्याची भीती अरविंद केजरीवालांना सतावते आहे. पंजाबमधील आपच्या स्थानिक नेत्यांमधील असंतोषही बाहेर येऊ लागला आहे. त्यामुळे एकंदरीतच आम आदमी पार्टीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
तत्पूर्वी एबीपी सीव्होटरच्या अंदाजानुसार, तीन महापालिकेतील 270 पैकी 218 जागांवर भाजपाला विजय मिळेल. आम आदमी पार्टीला 24 आणि काँग्रेसला 22 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. बीएसपीला केवळ 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार, भाजपाला 80 जागांचा फायदा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसला 55 आणि बीएसपीला 49 जागांचे नुकसान होत आहे. तसेच आज तक - एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार, भाजपाला 202 ते 220 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 19 ते 31 जागा आणि आम आदमी पार्टीला 23 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 8 ते 16 जागांवर अपक्ष आणि अन्य पक्षांचे उमेदवार विजयी होतील, असा कयास आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईव्हीएमच्या मशिनच्या गडबडीबाबत तक्रार केली आहे. मतदान अधिकाऱ्यांनी अनेक मतदारांना मतदान करू दिले नाही, असेही यात म्हटले आहे.