इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून या कंपनीने दिली भाजपाला सर्वाधिक देणगी, अशी आहे संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 07:03 PM2024-03-22T19:03:17+5:302024-03-22T19:03:58+5:30
Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी भाजपाला (BJP) सर्वाधिक देणग्या मिळाल्याने विरोधकांकडून भाजपावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून भाजपाला सर्वाधिक देणगी देणाऱ्या कंपनीचं नावही समोर आलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांना विविध कंपन्यांकडून इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून मिळालेल्या देणग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. या इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी भाजपाला सर्वाधिक देणग्या मिळाल्याने विरोधकांकडून भाजपावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून भाजपाला सर्वाधिक देणगी देणाऱ्या कंपनीचं नावही समोर आलं आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार हैदराबादस्थित बांधकाम कंपनी मेघा इंजिनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडने भाजपाला सर्वाधिक देणगी दिली आहे.
मेघा इंजिनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडने भाजपाला ५८४ कोटी रुपयांची देणगी दिल्याची माहिती समोर आली आहे. तर याच कंपनीच्या समुहातील कंपनी असलेल्या वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडने ८० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या उद्योग समुहाने दोन्ही देणग्यांच्या माध्यमातून भाजपाला एकूण ६६४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
मुंबईस्थित क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भाजपाला ३७५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर या कंपनीने इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून एकूण ४१० कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. या कंपनीचा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडशी संबंध असल्याचा दावा करण्यात येत होता, रिलायन्सने हे वृत्त फेटाळून लावले आहे.
भारती एअरटेल लिमिटेडने इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून १८३ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. तर कोलकात्यामध्ये मुख्यालय असलेल्या मदनलाल लिमिटेडने १७५ कोटी आणि या समुहातील दुसरी कंपनी असलेल्या केवेंटर फूड पार्क इन्फ्रा लिमिटेडने बाँडच्या माध्यमातून १४४.५ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. अशा प्रकारे या समुहाने एकूण ३२० कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत.