Meghalay: मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला, दोन दिवसांची संचारबंदी लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 08:35 AM2021-08-16T08:35:34+5:302021-08-16T08:50:30+5:30
Meghalay riots: हिंसाचारानंतर मेघालय आणि राज्याच्या इतर भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद.
शिलांग: मेघालयमध्ये माजी बंडखोर नेता चेरिशस्टारफील्ड थांगखू याच्या मृत्यूवरुन हिंसाचार वाढत आहे. रविवारी आंदोलकांनी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या खाजगी निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केला. हिंसा आणि निदर्शनांमुळे शिलाँगमध्ये दोन दिवसांचा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
तत्पूर्वी रविवारी सायंकाळी राज्याचे गृहमंत्री लखन रिंबुई यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यातील हिंसक घटनांनंतर राजीनामा दिला. हिंसक घटनांनंतर शिलाँगमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, मेघालय आणि राज्याच्या इतर भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आदेशात असे म्हटले आहे की 17 ऑगस्ट पर्यंत कर्फ्यू लागू राहील.
शिलाँगच्या जाआव परिसरातील मावकीनरोह पोलीस चौकीच्या पोलीस वाहनाला आज दुपारी अज्ञात व्यक्तींनी जाळले. चौकीच्या प्रभारीसह वाहनातील पोलिस या घटनेतून थोडक्यात बचावले. माजी विद्रोही नेता चेरिशस्टारफिल्ड थांगखुय याच्या घरी झालेल्या पोलिसांच्या छाप्यादरम्यान त्याचा मृत्यू झला होता. त्यानंतर शिलाँगच्या काही भागात अस्वस्थ शांतता दिसून येत आहे.
थांगखूच्या कुटुंबाने त्याच्या मृत्यूला "पोलिसांनी केलेली क्रूर हत्या" म्हटले आहे. त्याच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक काळे झेंडे घेऊन सहभागी झाले. शनिवारी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी बंडखोर गटाचा माजी नेता हिनट्रॅप नॅशनल लिबरेशन कौन्सिलच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश देणार असल्याचे म्हटले.