मेघालय : कॉनरॅड संगमा यांच्यापुढे आघाडी सांभाळण्याचेच आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:45 AM2018-03-06T01:45:47+5:302018-03-06T01:45:47+5:30
मेघालयात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे २१ जागा मिळूनही बहुमतापर्यंत पोहोचता न आल्याने मुख्यमंत्री मुकुल संगमा यांची संधी गेली आणि आता दुस-या क्रमांकावर असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) नेते कॉनरॅड संगमा मुख्यमंत्री होत आहेत.
शिलाँग - मेघालयात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे २१ जागा मिळूनही बहुमतापर्यंत पोहोचता न आल्याने मुख्यमंत्री मुकुल संगमा यांची संधी गेली आणि आता दुस-या क्रमांकावर असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) नेते कॉनरॅड संगमा मुख्यमंत्री होत आहेत. त्यांच्या पक्षाचे १९ जण विजयी झाले आहेत. या निवडणुकीत मेघालयात कोणालाच बहुमत नसल्याने कानरॅड संगमा यांचा एनपीपी, भाजपा, यूडीपी, पीडीएफ, हिल्स स्टेट पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी व एक अपक्ष अशा आघाडीचे सरकार बनणार आहे. ही मोट बांधण्याचे काम भाजपानेच केले. कॉनरॅड संगमा यांना ३४ आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र ही आघाडी सांभाळणे सोपे नाही, याची कल्पना कॉनरॅड यांनाही आहे. त्यांनी ते बोलूनही दाखवले आहे.
कॉनरॅडचा राजकीय प्रवास
अवघ्या ४0 वर्षांचे कॉनरॅड प्रथम २00८ साली मेघालय विधानसभेवर निवडून गेले आणि मंत्री झाले. मंत्री झाल्यानंतर अवघ्या १0 दिवसांत त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. ते २00९ ते २0१३ या काळात विरोधी पक्ष नेते होते. मात्र २0१४ साली ते लोकसभेवर निवडून गेले. मुख्यमंत्री होत असल्याने तेही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत. त्यांचे वडील पी. ए. संगमा आधी काँग्रेसमध्ये होते. नंतर शरद पवार यांच्यासमवेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. कॉनरॅड व अगाथा हेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र पी. ए. संगमा यांना २0१२ साली राष्ट्रवादीमधून दूर करण्यात आल्यानंतर त्यांनी एनपीपीची स्थापना केली आणि त्यांची मुलेही त्या पक्षाचा भाग बनली. भाजपाने ईशान्येतील राज्यांमध्ये नॉर्थ ईस्ट डेमॉक्रेटिक अलायन्स नेडा) स्थापन केल्यावर एनपीपीही त्याचा भाग बनली.
कोण आहेत कॉनरॅड संगमा
कॉनरॅड संगमा हे माजी लोकसभाध्यक्ष पी. ए. संगमा यांचे पुत्र आहेत. कॉनरॅड यांची बहिण अगाथा संगमा याही विधानसभेवर निवडून आल्या आहेत. यूपीएच्या काळात डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्या राज्यमंत्री होत्या. त्यांचे नावही यंदा मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात होते. मात्र कॉनरॅड यांच्या गळ्यात ती माळ पडत आहे.
त्रिपुरामध्ये बिप्लव देव यांचेच नाव नक्की, मित्रपक्षाचा मात्र विरोध
आगरतळा - त्रिपुरामध्ये मतदान झालेल्या ५९ पैकी ३५ जागांवर भाजपाला विजयी करताना तेथील मतदारांनी डाव्यांची २५ वर्षांची सत्ता उलथवून लावली. त्यामुळे भाजपाकडे स्पष्ट बहुमत असून, प्रदेशाध्यक्ष बिप्लव देव यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. मात्र या निवडणुकीत भाजपाने ज्या इंडिजिनस पीपल्स फ्रंट आॅफ त्रिपुराशी (आयपीएफटी) आघाडी केली, त्या पक्षाने मात्र राज्याचा मुख्यमंत्री आदिवासी असावा, अशी मागणी केली आहे.
कोण आहेत बिप्लव देव?
बिप्लव देव ४६ वर्षांचे असून, त्यांचे शिक्षण त्रिपुरा व दिल्लीत झाले आहे. ते सुरुवातीपासून रा. स्व. संघात सक्रिय होते. ते काही काळ जिम्नॅशियम इन्स्ट्रक्टरही होते. त्रिपुरामध्ये भाजपाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणाºया नेत्यांमध्ये सुनील देवधर यांच्याबरोबरच बिप्लव देव यांचाही समावेश आहे. त्यांनी निवडणूक प्रचारासाठी प्रचंड मेहनत केली. त्रिपुरातील तरुणांना रोजगार आणि सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगानुसार पगार ही आश्वासने त्यांनी दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. निवडणूक प्रचारासाठी भाजपाचे अनेक नेते केवळ देव यांच्यामुळे त्रिपुरामध्ये गेले होते.
सत्ता मिळाली पण...
भाजपाला आयपीएफटीच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करणे शक्य आहे. मात्र तसे केल्यास आदिवासी भागात
पक्षाला अडचणींना सामोरे जावे लागेल. आयपीएफटीची मागणीच मुळी आदिवासी मुख्यमंत्री हवा, अशी आहे. त्याहून भाजपासाठी अडचण म्हणजे आयपीएफटीचे नेते स्वतंत्र आदिवासी राज्याची सातत्याने मागणी करीत आले आहेत. म्हणजेच फुटीरवादी पक्षाशी मैत्री देव यांना कदाचित अडचणीची ठरेल. या पार्श्वभूमीवर भाजपा काय भूमिका घेते, हे पाहायला हवे.
नागालँडमध्ये नैफियू रिओ चौथ्यांदा भूषविणार मुख्यमंत्रिपद
कोहिमा - नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमॉक्रेटिक पीपल्स पार्टी (एनडीपीपी) चे नेते नैफियू रिओ मुख्यमंत्री होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत एनडीपीपीचे नेते असलेले रिओ हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांनी सोमवारीच लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
एनडीपीपी व भाजपा यांच्या आघाडीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले असून, त्यात रिओ यांचा मोठा वाटा आहे. मात्र एडीपीपीला भाजपावरच अवलंबून राहावे लागेल. त्यांना सत्तेत राहण्यासाठी भाजपाचे सतत ऐकावे लागेल, अशी चिन्हे आहेत.
भाजपाला मिळाला आयता मित्र!
मात्र रिओ यांनी यावर्षी जानेवारीमध्ये नॅशनल पीपल्स फ्रंटचा राजीनामा दिला. त्याआधीच मे २0१७ मध्ये त्यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या एनडीपीपीशी त्यांनी घरोबा केला. त्याचवेळी त्यांनी नागालँड विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. भाजपाचीही त्या राज्यात फारशी ताकद नसल्याने त्या पक्षाला तिथे मित्र हवा होता.
विधानसभा निवडणुकांत एनडीपीपीने ४0, तर भाजपाने २0 जागा लढवल्या. त्याचा फायदा भाजपालाही झाला आणि त्या राज्यात भाजपा प्रथमच सत्तेत सहभागी होत आहे. (वृत्तसंस्था)
कोण आहेत रिओ?
रिओ हे ६७ वर्षांचे असून, त्यांनी ११ वर्षे नागालँडचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. ते पहिल्यांदा २00३ साली नॅशनल पीपल्स फ्रंटतर्फे निवडून आले. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते आणि तेथून फुटून त्यांनीच या फ्रंटची स्थापना केली होती. त्यानंतर २00८ व २0१३ सालीही ते निवडून आले आणि मुख्यमंत्री बनले. त्यांच्यावर २0१४ साली भ्रष्टाचाराचे अनेक आरोपी झाले. त्यांनी सर्व आरोपांचा इन्कार केला. मात्र जनमत आपल्या विरोधात असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्याच वर्षी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते निवडून आले आणि तेव्हापासून आतापर्यंत ते खासदार होते.
श्रीमंत मुख्यमंत्री
नैफियू रिओ यांची संपत्ती ३६.४0 कोटी रुपये इतकी आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घेतल्याने रिओ बिनविरोध निवडून आले. त्याने आयत्या वेळेत माघार घेतल्यामुळेही उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.