"गप्प राहिलात तर तुम्हाला राष्ट्रपती करू म्हणाले होते पण मी..."; सत्यपाल मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 06:37 PM2022-03-07T18:37:47+5:302022-03-07T18:40:05+5:30

Satyapal Malik And Narendra Modi : तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

meghalaya governor satyapal malik reaches haryana jind said he will return to active politics soon | "गप्प राहिलात तर तुम्हाला राष्ट्रपती करू म्हणाले होते पण मी..."; सत्यपाल मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

"गप्प राहिलात तर तुम्हाला राष्ट्रपती करू म्हणाले होते पण मी..."; सत्यपाल मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

googlenewsNext

नवी दिल्ली - मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी सात महिन्यांनंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर ते सक्रिय राजकारणात येऊ शकतात, असे संकेत दिले आहेत. याच दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. "आपल्याला राष्ट्रपतीपदाचे आमिष दाखवले आणि गप्प राहिलात तर तुम्हाला राष्ट्रपती बनवले जाईल" असं सांगितल्याचा मोठा दावा मलिक यांनी केला. तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. हरियाणाच्या जिंदमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

येत्या सहा ते सात महिन्यांत आपला राज्यपालपदाचा कार्यकाळ संपणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर मी उत्तर भारतातील सर्व शेतकर्‍यांना एकत्र करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे असंही मलिक यांनी सांगितलं. पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक गावांना मी भेट दिली होती. ग्रामीण भागातील जनता भाजपा नेत्यांवर प्रचंड नाराज होती. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही शेतकऱ्यांच्या संतापामुळे अनेक किलोमीटर पळावे लागले होते. गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर शीख समुदाय आणि शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून लेबल केल्याबद्दल राज्यपालांनी केंद्र सरकारवरही टीका केली.

"पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या मृत्यूवर एकही शब्दही काढला नाही"

सत्यपाल मलिक यांनी आपण 700 हून अधिक शेतकरी बांधवांना गमावले आहे. पण श्वानांच्या मृत्यूवर पत्र लिहिणाऱ्या पंतप्रधानांनी त्या शेतकऱ्यांच्या मृत्यूवर एकही शब्दही काढला नाही म्हणत हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार एमएसपीवर कायदेशीर हमी देण्यात अपयशी ठरले आहे. पानिपतमध्ये पंतप्रधानांच्या एका मित्राने 50 एकर जमिनीवर गोदाम बांधले. त्यानंतर तीन कृषी कायदे आणले गेले. कारण त्यांना कमी भावात गहू खरेदी करून चढ्या भावात विकायचा आहे. हा सरकार आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष आहे, असे मलिक म्हणाले.

"राज्यपाल आणि राष्ट्रपती ही पदे माझ्यासाठी काहीच नाहीत"

कृषी कायदे हे मोठ्या उद्योगांच्या हितासाठी केले गेले होते, असे कृषी आंदोलनादरम्यान ते मलिक म्हणाले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने न बोलल्यास त्यांना राष्ट्रपतीपदी बढती दिली जाईल, असे भाजपामधील त्यांच्या काही मित्रांनी सांगितल्याचा दावाही मलिक यांनी केला. त्याने प्रत्येक मार्गाने आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यांच्या सर्व ऑफर नाकारल्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोललो. कारण राज्यपाल आणि राष्ट्रपती ही पदे माझ्यासाठी काहीच नाहीत, असे मलिक बोलले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: meghalaya governor satyapal malik reaches haryana jind said he will return to active politics soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.