मेहबूबा मुफ्तींना दहशतवाद्याचा कळवळा; म्हणे मन्नान वाणी हिंसाचारातील पीडित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 09:05 AM2018-10-16T09:05:21+5:302018-10-16T09:35:02+5:30

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा कळवळा आला आहे.

mehbooba backs suspended students of amu who are facing sedition charges says mannan vani a victim | मेहबूबा मुफ्तींना दहशतवाद्याचा कळवळा; म्हणे मन्नान वाणी हिंसाचारातील पीडित

मेहबूबा मुफ्तींना दहशतवाद्याचा कळवळा; म्हणे मन्नान वाणी हिंसाचारातील पीडित

Next

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना  हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा कळवळा आला आहे. त्यांनी वाणीला काश्मीर हिंसाचारातील पीडित असं म्हटलं आहे. मुफ्ती यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील (AMU) देशद्रोहाच्या आरोपाखाली निलंबन करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याची मागणीही मुफ्ती यांनी केली आहे. 

मन्नान वाणीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला होता. मात्र जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गुरुवारी ( 11 ऑक्टोबर ) जवान आणि दहतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. त्यामध्ये मन्नानचा समावेश होता. मन्नानच्या मृत्यूनंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील केनेडी सभागृहात 15 विद्यार्थी एकत्र जमले. त्यांनी वाणीसाठी नमाज अदा करण्यास सुरुवात केली. विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे ही सभा घेतल्याची माहिती समोर आली होती.

मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर शोकसभा घेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने (AMU) तीन विद्यार्थ्यांचं निलंबित केले आहे. मात्र AMU च्या विद्यार्थी संघाचा माजी नेता सज्जाद सुभानने अशा प्रकारे कोणतीही सभा झाली नसून केवळ काश्मीरच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी एकत्र आल्याचा दावा केला आहे. तसेच जर विद्यार्थ्यांवर असलेल्या केस मागे घेतल्या नाही तर काश्मिरी विद्यार्थी विद्यापीठ सोडून जातील असेही त्याने म्हटलं आहे. विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 


विद्यापीठाने निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आता मेहबूबा मुफ्ती आणि त्यांचा पीडीपी पक्ष पुढे सरसावला आहे. मुफ्ती यांनी विद्यार्थ्यांवर दबाव टाकल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही दिला आहे. केंद्र सरकारने या गंभीर प्रकरणात हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांवरील कारवाई रद्द करावी अशी मागणी पक्षाने केली आहे. तसेच राज्य सरकारला संवेदनशीलतेने प्रकरण हाताळण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. 



कश्मीरमधील अमानूष हिंसाचाराचा बळी ठरलेल्या विद्यापीठातील आपल्या माजी सहकाऱ्यासाठी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित केला तर त्यात अयोग्य काय असा सवाल पीडीपीने केला आहे. AMUमधील कश्मिरी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी मूकमोर्चा काढला होता.

Web Title: mehbooba backs suspended students of amu who are facing sedition charges says mannan vani a victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.