आमचा मान व्याजासह परत मिळवणार, सुप्रीम कोर्ट देव नाही; 370च्या निर्णयावर मेहबुबा संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 06:24 PM2023-12-17T18:24:54+5:302023-12-17T18:25:27+5:30
Mehbooba Mufti: सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय एकमताने वैध मानला आहे.
Mehbooba Mufti on Supreme Court 370 Decision : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 2019 मध्ये हटवले. यानंतर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. या निर्णयावर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. J&K च्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी सुप्रीमो मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला.
आम्ही आमचा मान...
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या की, 'जम्मू-काश्मीरच्या जनतेने अनेक वर्षे धैर्य दाखवले आहे. कुणीही हिंमत गमावू नये, आपले बलिदान व्यर्थ जाणार नाही. आम्ही निर्णय मान्य करुन घरी बसावे, अशी आमच्या विरोधकांची इच्छा आहे, पण हे होणार नाही. आम्ही अखेरपर्यंत राज्यासाठी लढत राहू. आम्ही आमचा गमावलेला मान व्याजासह परत मिळवू.'
#WATCH | On Supreme Court verdict on Article 370 in J&K, PDP Chief Mehbooba Mufti says, "...Supreme Court's verdict is not God's verdict, we will not lose hope and will continue our fight." pic.twitter.com/iDpFN7TWDW
— ANI (@ANI) December 17, 2023
सर्वोच्च न्यायालय देव नाही
यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयावरही टीका केली. 'सर्वोच्च न्यायालय देव नाही. सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय वेगळे आहेत. संविधान सभेशिवाय कलम 370 हटवता येणार नाही, असे याच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, पण आता त्याच सर्वोच्च न्यायालयने वेगळा निर्णय दिला. आम्ही आमचा संघर्ष सुरुच ठेवू. '
'भारताच्या संकल्पनेचे अपयश'
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मुफ्ती यांनी एक व्हिडिओ मेसेज शेअर करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भारताची संकल्पना फोल ठरणार असल्याचे म्हटले होते. संसदेत घेतलेला असंवैधानिक आणि बेकायदेशीर निर्णय कायदेशीर ठरवण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा निर्णय केवळ जम्मू-काश्मीरसाठी फाशीची शिक्षाच नाही, तर भारताच्या संकल्पनेलाही अपयशी ठरवतोय, असं मुफ्ती म्हणाल्या.