जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 01:48 PM2024-10-09T13:48:21+5:302024-10-09T13:48:47+5:30
Mehbooba Mufti : १० वर्षांपूर्वीपर्यंत जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या पीडीपीला यंदाच्या निवडणुकीत आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
Mehbooba Mufti PDP in Jammu Kashmir Election 2024: जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने मोठं यश मिळवलं आहे. तब्बल १० वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा मोठा विजय झाला. दरम्यान, १० वर्षांपूर्वीपर्यंत जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या पीडीपीला यंदाच्या निवडणुकीत आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
२०२४ च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाला केवळ ३ जागा मिळाल्या. हाच पक्ष २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून किंग मेकर बनला होता आणि भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं होतं. २०२४ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीला केवळ ८.८७ टक्के मते मिळाली. या निवडणुकीत पीडीपीनं कुपवाडा, त्राल आणि पुलवामा या तीन जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान, त्रालची जागा अशी होती की पीडीपीचे उमेदवार रफिक अहमद नाईक केवळ ४६० मतांच्या फरकाने विजयी झाले.
मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीचाही पराभव
कुपवाड्यातील मीर मोहम्मद फयाज आणि पुलवामा येथील वहीदुर रहमान पारा हे पक्षाची विश्वासार्हता वाचवण्यात हातभार लावू शकतात. इतकंच नाही तर मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांनी पहिल्यांदाच आपली पारंपारिक जागा बिजबेहारा येथून निवडणूक लढवली. मात्र, पीडीपी ही जागाही वाचवू शकली नाही आणि इल्तिजा मुफ्ती यांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या बशीर अहमद शाह वीरी यांनी ९७७० मतांनी पराभव केला.
१० वर्षांपूर्वीपर्यंत पीडीपीचं होतं वर्चस्व
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. त्यावेळी पीडीपीला एकूण २८ जागा मिळाल्या होत्या आणि मतांची टक्केवारी २२.६७ टक्के होती. हे देखील मागील निवडणुकीपेक्षा सात जागा अधिक होत्या. म्हणजे पक्षाचा जनाधार सतत वाढत होता.