मोदी सरकार महिलांना घाबरते; ओमर अब्दुल्लांच्या सुटकेनंतर महेबुबांचा पंतप्रधानांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 07:24 PM2020-03-24T19:24:10+5:302020-03-24T19:30:18+5:30
आपल्या सुटकेवरून महेबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत, मोदी सरकार महिलांना घाबरते, असे म्हटले आहे.
नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवल्यानंतर नजरकैदेत असलेल्या फारूक अब्दुल्ला आणि त्यांचे चिरंजीव ओमर अब्दुल्ला यांची जवळपास 8 महिन्यानंतर सुटका करण्यात आली आहे. मात्र, अद्याप पीडीपी नेता महेबुबा मुफ्ती यांची सुटका करण्यात आलेली नाही. हे तिघेही पूर्वीच्या काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.
यादरम्यानच, आपल्या सुटकेवरून महेबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत, मोदी सरकार महिलांना घाबरते, असे म्हटले आहे.
सरकारने मंगळवारी (24 मार्च) ओमर अब्दुल्ला यांची सुटका केली. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्झा काढण्याच्या एकदिवस आधीच रात्री उशिरा ओमर अब्दुल्ला यांना कैदे करण्यात आले होते. यानंतर त्यांना पब्लिक सेफ्टी एक्टदेखील लावण्यात आला होता.
नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर आठ महिन्यांनी आपण आई-वडिलांसोबत दुपारचे जेवण केल्याचे भावूक ट्विटही ओमर यांनी केले.
ओमर अब्दुल्ला यांच्या सुटकेनंतर महेबुबा मुफ्ती यांनी ट्विटर केले आहे, की आनंद वाटला त्यांची (ओमर अब्दुल्ला) सुटका झाली. महिला शक्ती आणी महिलांच्या उद्धाराच्या चर्चा होत असतात. मात्र, असे वाटते, की सरकार सर्वाधिक महिलांनाच घाबरते.
नुकतीच महेबुबा मुफ्ती यांच्या मुलीनेही जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांकडे पत्र लिहून महेबुबा यांच्या सुटकेची मागणी केली होती.