काश्मीरमधील शांतता चर्चेचे मेहबुबा मुफ्ती यांनी केले स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 08:37 PM2017-10-23T20:37:33+5:302017-10-23T20:39:11+5:30
केंद्र सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीरमधील घटकांशी चर्चा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी स्वागत केले आहे.
श्रीनगर - केंद्र सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीरमधील घटकांशी चर्चा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी स्वागत केले आहे. काश्मिरमधील जनता सध्या बंदुकांमध्ये अडकून पडली आहे आणि त्यांना त्यामधून बाहेर पडायचे आहे, असे त्या म्हणाल्या. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्यातील घटकांशी चर्चा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केली होती. तसेच या चर्चेसाठी आयबीचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मेहबुबा यांनी आपले मत मांडले.
मेहबुबा म्हणाल्या, "दिनेश्वर शर्मा चांगले व्यक्ती आहेत. त्यांची विश्वसनीयता अधिक आहे. तसेच उत्तर-पूर्वेतील चर्चेमध्येही ते सहभागी होते. ही एक चांगली सुरुवात आहे. तसेच यावेळी त्याची गरजही आहे. त्यामुळे मी या निर्णयाचे स्वागत करते." दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केवळ काश्मीरमधील जनतेशी चर्चा करून हा प्रश्न सुटणार नाही तर पाकिस्तानशीसुद्धा चर्चा झाली पाहिजे असे मत मांडले आहे.
ऑपरेशन ऑलआऊटच्या माध्यमातून लष्कराने काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यानंतर आता केंद्र सरकारने राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्यातील घटकांशी चर्चा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. काश्मीरमधील चर्चेसंबंधी राजनाथ सिंह म्हणाले, सरकारचे प्रतिनिधी म्हणून दिनेश्वर शर्मा हे जम्मू काश्मीरमधील लोकांच्या आशा अपेक्षा समजून घेण्यासाठी चर्चा सुरू करतील. शर्मा यांना चर्चा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य असेल. दिनेश्वर शर्मा यांना कॅबिनेट सचिव पदाचा दर्जा असेल. तसेच काश्मीरमध्ये कुणासोबत चर्चा करायची, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शर्मा यांना असेल." पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर प्रश्नाबाबत खूप गंभीर असल्याचेही राजनाथ सिंह यांनी पुढे सांगितले. तसेच काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यात येणार का, असे विचारले असता त्याबाबतचा अंतिम निर्णय दिनेश्वर शर्मा हेच घेतील, असेही सिंह पुढे म्हणाले.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले,"काश्मीरमधील चर्चेची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. तसेच यामध्ये काश्मिरी तरुणांवर विशेष लक्ष दिले जाईल. सरकारचे प्रतिनिधी म्हणून दिनेश्वर शर्मा यांना कुठल्याही पक्षाशी चर्चा करण्याचे स्वातंत्र्य असेल." केंद्र सरकार सर्व राजकीय पक्ष आणि जम्मू आणि काश्मीरमधील सर्व पक्षांसोबत चर्चा करण्याची तयारी करत आहे. ज्यामुळे काश्मीर खोऱ्यात पुन्हा शांतता प्रक्रिया प्रस्थापित होऊ शकेल."