मेहबुबा बनणार काश्मीरच्या मुख्यमंत्री
By admin | Published: March 25, 2016 03:58 AM2016-03-25T03:58:03+5:302016-03-25T03:58:03+5:30
मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षपदी व मुख्यमंत्रीपदीच्या उमेदवार म्हणून मेहबुबा मुफ्ती यांची बिनविरोध निवड झालीे. मुफ्ती मोहम्मद
श्रीनगर : मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षपदी व मुख्यमंत्रीपदीच्या उमेदवार म्हणून मेहबुबा मुफ्ती यांची बिनविरोध निवड झालीे. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या मेहबुबा काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील.
आज पार्टी अध्यक्षांच्या निवडीसाठी मेहबुबा यांच्या घरी पीडीपीच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक झाली. त्यात मेहबुबा यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते मुजफ्फर हुसेन बेग यांनी दिली.
भाजपाच्या पाठिंब्याचे पत्र मिळाल्यानंतर शुक्रवारी त्या सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना भेटणार आहेत. त्यानंतर मेहबुबा मुफ्ती आणि भाजपा नेते मिळून शपथविधीची तारीख ठरवतील.
कोणतीही अट नाही...
मंगळवारी मेहबुबा मुफ्ती यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पीडीपी-भाजपा युतीच्या चर्चांना वेग आला होता. त्यात ठरलेल्या अजेंड्यानुसार आणि कोणत्याही अटींविना सरकार स्थापन करण्यात येणार असल्याचेही बेग यांनी सांगितले. एकूण ८७ सदस्यसंख्या असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीकडे सर्वाधिक २७ आमदार असून, भाजपाकडे २५ आमदारांचे बळ आहे.