मेहुल चोक्सी, नीरव अन् विनय मिश्रा...पळपुटे उद्योगपती नेहमी कॅरिबियन देशांमध्येच पळ का काढतात? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 07:48 PM2022-03-28T19:48:12+5:302022-03-28T19:49:08+5:30
मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विनय मिश्रा, संदेसरा बंधू, जतीन मेहता अशी मोठीच यादी आहे. भारतीय बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून हे उद्योगपती परदेशात पळाले आहेत.
मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विनय मिश्रा, संदेसरा बंधू, जतीन मेहता अशी मोठीच यादी आहे. भारतीय बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून हे उद्योगपती परदेशात पळाले आहेत. दुसरं म्हणजे या सर्वांनी भारतातून पळ काढताना कॅरेबियन देशांना पसंती दिली आहे. सर्वजण कॅरेबियन देशांमध्ये आश्रयाला आहेत. त्यांनी कॅरिबियन देशांचं नागरिकत्व घेतलं आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर तपास यंत्रणांना त्यांना पकडणं आता कठीण झालं आहे. या देशांमध्ये असे काय आहे जे पळपुट्या आर्थिक गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनत आहेत. कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत का पोहोचू शकत नाहीत का?
गेल्या वर्षीची 10 मार्चची गोष्ट आहे. तुरुंगात असलेले युनिटेकचे प्रवर्तक संजय चंद्रा यांच्या पत्नी प्रीती चंद्रा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमिग्रेशन काउंटरवर उभ्या होत्या. त्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची वाट पाहात होत्या. त्या आंतरराष्ट्रीय विमान पकडून देश सोडणार होत्या. पण, ईडी आणि इतर तपास यंत्रणा प्रिती यांच्या शोधात असल्याची माहिती समोर आली. प्रीती यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
इमिग्रेशन अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटलं की प्रीती यांनी आंतरराष्ट्रीय फ्लाइटचं बुकिंग केलं होते. प्रिती यांना त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे याची कल्पना त्यांना नव्हती असं कसं होईल असं आश्चर्य इमिग्रेशन अधिकाऱ्यांना वाटलं. ज्या व्यक्तीच्या विरोधात ही नोटीस जारी केली जाते, त्याला देश सोडून जाणं अशक्य होतं. अशा व्यक्तींची माहिती बाहेर पडताना सर्वत्र पोहोचवली जाते. प्रीती यांच्या चौकशीत त्यांनी डॉमिनिकन रिपब्लिकचे नागरिकत्व घेतल्याचं समोर आलं. त्यांना इमिग्रेशन डेस्कवरून बाहेर जाण्यास हिरवा कंदिल मिळाला असता, तर त्यांना परत आणताना अंमलबजावणी यंत्रणांना घाम फुटला असता.
फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी एजन्सी अजूनही लढा देत आहेत. कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात तो फरार आहे. त्याने कॅरिबियनमधील अँटिग्वा आणि बारबुडा या देशांचे नागरिकत्व घेतले आहे. भारताचा अँटिग्वा किंवा बारबुडा आणि डोमिनिकन रिपब्लिक यांच्याशी प्रत्यार्पण करार नाही. यामुळे ते भारतातील फरारी आर्थिक गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. अलीकडे भारतीय नागरिकत्व सोडून कॅरेबियन किंवा पॅसिफिक देशांचे नागरिकत्व घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. या यादीत सर्वात अलीकडचे तृणमूल युवक काँग्रेसचे नेते विनय मिश्रा यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. ते टीएमसीचे लोकसभा खासदार आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचे निकटवर्तीय आहेत.
कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने विनय मिश्राविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर लगेचच नोव्हेंबर 2020 मध्ये ते देशातून पळून गेले. मिश्रा यांनी पॅसिफिकमधील वनौटूचे नागरिकत्व घेतलं होतं. मिश्रा यांचाही ईडी शोध घेत आहे. कोळसा घोटाळ्यात त्यांनी १३०० कोटींचा गैरव्यवहार केला आहे.
तपास यंत्रणांच्या अडचणी वाढतात
चोक्सीचा पुतण्या आणि 13,500 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने बेल्जियममध्ये आश्रय मागितला. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही देश सोडून गेले होते. तो आता कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही.
ईडीच्या भीतीने काहींनी नायजेरिया, अल्बेनिया आणि अगदी सेंट किटीसची निवड केली आहे. स्टर्लिंग बायटेकचे चेतन आणि नितीन हे संदेसरा बंधू नायजेरियात पळून गेले होते. तेथे त्यांनी ऑइल रिग्स, खाजगी जेट आणि जहाजे खरेदी केली. त्यांच्याकडे अमेरिका, ब्रिटन आणि दुबईमध्ये लक्झरी प्रॉपर्टीज आहेत. ईडीने त्याच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत अंदाजानुसार 9,700 कोटी रुपये आहे.
दोन्ही भावांनी कुटुंबासह २०१७ मध्ये देश सोडल्याची माहिती भारतीय यंत्रणांकडे आहे. ते आता नायजेरिया आणि अल्बेनियामध्ये कुठेतरी आहेत. त्यांच्याकडे दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. नायजेरियातून या आरोपींच्या प्रत्यार्पणाची विनंती भारतानं केल्याचं एका सूत्रानं सांगितलं. परंतु, त्यांनी आज्ञा पाळण्यास नकार दिला. विन्सम डायमंड्सचे आणखी एक हिरे व्यापारी जतिन मेहता यांचीही अशीच कहाणी आहे. त्यांनी 2014 मध्ये सरकारी बँकेची 6,800 कोटी रुपयांची फसवणूक करून देश सोडून पलायन केलं. त्यांनी सेंट किटीसचे नागरिकत्व घेतल्याचं सांगितलं जातं.