चाेक्सीने ‘राज’ नाव सांगितले; खाेटे हिरे भेट, प्रेयसी जराबिकाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 08:43 AM2021-06-09T08:43:49+5:302021-06-09T08:44:42+5:30
mehul choksi : मेहुल चाेक्सीने अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यात त्याने प्रेयसी जराबिकाचादेखील या कटात सहभाग असल्याचा आराेप केला हाेता.
नवी दिल्ली : बँकांची काेट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा मेहुल चाेक्सी याच्या अपहरणप्रकरणात त्याची प्रेयसी बार्बरा जराबिका हिने धक्कादायक खुलासा केला आहे. चाेक्सीने स्वत:ची ‘राज’ या नावाने ओळख करून दिली हाेती आणि खाेटे हिरे भेट दिले हाेते, असा खुलासा जराबिका हिने केला आहे. दरम्यान, चाेक्सीबाबत न्यायालय निर्णय घेईल, असे डाॅमिनिकाचे पंतप्रधान रुझव्हेल्ट स्केरीट यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायालयाने तहकूब केली असून, सुनावणीची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
मेहुल चाेक्सीने अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यात त्याने प्रेयसी जराबिकाचादेखील या कटात सहभाग असल्याचा आराेप केला हाेता. याप्रकरणावरून जराबिका हिने माैन साेडले असून, एका मुलाखतीत तिने खळबळजनक खुलासे केले आहेत. चाेक्सीच्या अपहरणात सहभाग असल्याचे फेटाळताना तिने सांगितले, की, मी २३ मे राेजी सायंकाळी ५ वाजण्याच्या आधीच अँटिग्वा साेडले हाेते. त्यामुळे दिवसाढवळ्या अपहरणाच्या गाेष्टीत तथ्य नाही.
चाेक्सी खाेटारडा
जराबिका म्हणाली, की पूर्वीच्या आयुष्याबाबत मला काहीही ठाऊक नव्हते. त्याला मी आवडत हाेते. पण, त्याने हे उघड हाेऊ दिले नाही. स्वत:ची त्याने ‘राज’ म्हणून ओळख करून दिली हाेती. गेल्या वर्षी अँटिग्वामध्ये ऑगस्टमध्ये त्याची प्रथम भेट झाली हाेती. त्याने मला हिरे भेट म्हणून दिले हाेते. मात्र, ते खाेटे निघाले. ताे खूप खाेटे बाेलला आहे.
हरीश साळवे बाजू मांडणार?
ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे मेहुल चाेक्सी प्रकरणात डाॅमिनिकाच्या उच्च न्यायालयात भारताची बाजू मांडण्याची शक्यता आहे. याप्रकरणात भारत सरकारला सहकार्य करीत असल्याची माहिती साळवे यांनीच दिली. भारत सरकार प्रतिवादी नसली तरीही डाॅमिनिकन प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे म्हणाले.