भारतातून पळालेला चाेक्सी ॲंटिग्वामधूनही झाला फरार, ‘पीएनबी’ बॅंकेची केली होती फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 07:22 AM2021-05-26T07:22:53+5:302021-05-26T07:23:27+5:30
Mehul choksi: ॲंटिग्वाच्या राॅयल पाेलीस दलाने चाेक्सीचे छायाचित्र प्रसिद्ध केले असून, त्याच्याबाबत माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेला काेट्यवधी रुपयांचा चुना लावून ॲंटिग्वामध्ये पळालेला गीतांजली जेम्सचा प्रमाेटर मेहुल चाेक्सी हा तेथूनही फरार झाला आहे. ॲंटिग्वा पाेलिसांनी चाेक्सी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असून, दाेन दिवसांपासून त्याचा शाेध घेण्यात येत आहे.
ॲंटिग्वाच्या राॅयल पाेलीस दलाने चाेक्सीचे छायाचित्र प्रसिद्ध केले असून, त्याच्याबाबत माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. चाेक्सी हा जाॅली हार्बर येथे राहत हाेता. ताे २३ मे २०२१ पासून बेपत्ता असल्याचे पाेलिसांनी सांगितले. रविवारी चाेक्सीला त्याच्या कारमध्ये शेवटचे पाहण्यात आले हाेते.
क्युबामध्ये पळाला?
चाेक्सीचे नागरिकत्व रद्द करण्यासाठी भारत सरकारकडून ॲंटिग्वा सरकारवर दबाव वाढत हाेता. त्यामुळे ताे क्युबा येथे पळाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तेथे त्याची संपत्ती आहे.
२०१८ मध्ये पळाला हाेता ॲंटिग्वामध्ये
पंजाब नॅशनल बॅंकेची १३ हजार ५०० काेटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी चाेक्सी आणि त्याचा भाचा नीरव माेदी यांच्यावर आराेप आहेत. चाेक्सी जानेवारी २०१८पासून ॲंटिग्वामध्ये वास्तव्यास हाेता. त्याने २०१७ मध्ये ॲंटिग्वा आणि बारबुडा या देशांचे नागरिकत्व घेतले हाेते.