मेहूल चोक्सीच्या देशाबाहेर रवानगीस न्यायालयाने दिली स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 06:04 AM2021-05-29T06:04:44+5:302021-05-29T06:05:43+5:30
Mehul Choksi: फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला पुढील आदेशापर्यंत कैरिबियाई देशातून अन्यत्र पाठविण्यास डोमिनिकाच्या एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थानिक मीडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नवी दिल्ली : फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला पुढील आदेशापर्यंत कैरिबियाई देशातून अन्यत्र पाठविण्यास डोमिनिकाच्या एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थानिक मीडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
डोमिनिकात अवैधपणे प्रवेश केल्याबद्दल चोक्सीला ताब्यात घेण्यात आले होते. चोक्सीच्या वकिलांकडून दाखल याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितले की, मेहुल चोक्सीला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. चोक्सीशी संपर्क होऊ दिला जात नाही. कायदेशीर मदत आणि घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे.
चोक्सीला पुढील आदेशापर्यंत कुठेही पाठविण्यास डोमिनिकाच्या हायकोर्ट ऑफ जस्टिसने स्थगिती दिली आहे. डोमिनिकातील चोक्सीचे वकील वायने मार्श यांनी एका रेडिओ शोला सांगितले की, खूप प्रयत्नानंतर चोक्सीशी थोडा वेळ बोलणे झाले. त्याने सांगितले की, एंटीगुआत जॉली येथे एका जहाजात आपल्याला जबरदस्तीने बसविण्यात आले आणि डोमिनिकात आणण्यात आले.