“देश दोन हिंदूमध्ये विभागला गेलाय; एक मंदिरांमध्ये प्रवेश करु शकतो, दुसरा नाही”: मीरा कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 09:00 AM2021-11-27T09:00:36+5:302021-11-27T09:08:43+5:30
धर्म बदलला तरी, जात बदलत नाही, असे सांगत माझे वडील धर्मपरिवर्तनाला नकार द्यायचे, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील मंडळी आपल्या विधानांमुळे चर्चेत आली आहेत. अगदी बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतपासून (Kangana Ranaut) ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यापर्यंत अनेकांची विधाने गाजताना दिसत आहेत. यातच आता लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार (Meira Kumar) यांची भर पडली आहे. देश दोन हिंदूमध्ये विभागला गेला आहे. एक मंदिरांमध्ये प्रवेश करु शकतो, दुसरा नाही, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे.
माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांच्या “द लाइट ऑफ एशिया:द पोएम दैट डिफाइंड बुद्धा” या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी आयोजित कार्यक्रमात मीरा कुमार बोलत होत्या. अनेकांनी माझ्या वडिलांना जातीय भेदभावामुळे हिंदू धर्म सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र, माझे वडील जगजीवन राम यांनी हिंदू धर्म सोडण्यास सपशेल नकार दिला होता. तसेच या चुकीच्या सामाजिक व्यवस्थेविरोधात लढा देण्याचा निर्धार त्यांनी केला, अशी आठवण मीरा कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितली.
२१ व्या शतकातही जाती व्यवस्था कायम
आजही २१ व्या शतकात जाती व्यवस्था कायम असल्याचे दिसून येते. आपला भारत देश दोन प्रकारच्या हिंदू समुदायांमध्ये विभागला गेला आहे. एक म्हणजे जो मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेऊ शकतो आणि दुसरा असा हिंदू समाज आहे, ज्याला अजूनही मंदिरांमध्ये प्रवेश नाकारला जातो, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे. तसेच धर्म बदला असा सल्ला देणाऱ्यांना वडील जगजीवन राम नेहमी विचारत असत की, धर्म बदलला म्हणून जात बदलणार आहे का, असेही मीरा कुमार यांनी सांगितले.
रस्ते चकचकीत झाले, मात्र विचार जुनेच आहेत
२१ व्या शतकात आपण आलो आहोत. अनेक गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल झालेले पाहायला मिळत आहेत. पायाभूत सुविधा सुधारताना दिसत आहेत. रस्ते चकचकीत झाले आहेत. मात्र, आपले विचार कधी चकचकीत होणार असा सवाल करत आजही पुजारी माझ्या गोत्राबाबत विचारणा करतात, तेव्हा त्यांना सांगते की, माझे संगोपन अशा वातावरणात झाले आहे, जिथे जात-पात मानली जात नाही. विविध धर्मांतील चांगल्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे, स्विकारल्या पाहिजेत आणि तोच आपला वारसा आहे, असेही मीरा कुमार यांनी यावेळी बोलताना नमूद केले.