हॅप्पीनेस क्लास : शाळेत रमल्या मेलानिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 02:17 AM2020-02-26T02:17:11+5:302020-02-26T02:17:30+5:30
मेलानिया यांना विद्यार्थ्यांनी झेंडूच्या फुलांचा हार घातला, तसेच त्यांना टिळा लावून त्यांचे औक्षण केले.
नवी दिल्ली : नानकपुरा येथील सर्वोदय एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेला मेलानिया यांनी भेट दिली. पूर्णत: विविध रंगांनी, फुलांनी नटलेल्या या शाळेत मेलानिया यांचे अनोखे स्वागत करण्यात आले. मेलानिया यांना विद्यार्थ्यांनी झेंडूच्या फुलांचा हार घातला, तसेच त्यांना टिळा लावून त्यांचे औक्षण केले.
शाळेच्या आवारातील विविध वाद्यांनी वातावरणात प्रसन्नता आणली. राजस्थानी फेटा घातलेले विद्यार्थी व निळ्या रंगाचा घागरा घातलेल्या विद्यार्थिनीने मेलानिया यांचे स्वागत केले. गुलाबी रंगाचा घागरा घातलेल्या विद्यार्थिनीशी मेलानिया यांनी संवाद साधला. त्यानंतर हॅप्पीनेस क्लासमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वर्गात मेलानिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांशी गप्पा मारतानाच मेलानिया त्यांच्यासोबत खेळही खेळल्या. शैक्षणिक मजकुरांनी वर्गाच्या भिंती सजल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. शाळेच्या वतीने त्यांना एक चित्र भेट देण्यात आले.
या भेटीवेळी शाळेला सुरक्षा यंत्रणांनी घेरले होते. विद्यार्थी गणवेशात होते. यावेळी मेलानिया म्हणाल्या की, माझा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारतीय लोक अतिशय चांगले व सहृदयी आहेत. मी व राष्ट्राध्यक्ष येथे अतिशय आनंदी आहोत. सर्वोदयचा अर्थ आहे की सर्वांसाठी उन्नती, समृद्धी. येथील शिक्षकांचे परिश्रम व विद्यार्थ्यांचा उत्साह सारे काही सांगतो आहे. ही खूपच चांगली शाळा आहे. अशा संकल्पना व उपक्रम जगाला प्रेरणा देऊ शकतात. माझे अभूतपूर्व स्वागत केल्याबद्दल आभार.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या स्वागतासाठी टष्ट्वीट केले की, मेलानिया आज आमच्या स्कूलमध्ये हॅप्पीनेस क्लासमध्ये सहभागी होतील. आमचे शिक्षक, विद्यार्थी आणि दिल्लीकरांसाठी हा खास दिवस आहे. भारत अनेक शतकांपासून जगाला आध्यात्मिकतेची शिकवण देत आला आहे. मला याचा आनंद आहे की, त्या आमच्या स्कूलमधून प्रसन्नतेचा संदेश घेऊन जातील.
अमेरिका येथून किती दूर आहे?
अमेरिका येथून किती दूर आहे? तिथे पोहचण्यासाठी किती वेळ लागतो? असे प्रश्न एका लहान मुलीने विचारले तेव्हा मेलानिया यांनी काहीच उत्तर दिले नाही.
मधुबनी पेंटिंग
मधुबनी (मिथिला) शैलीतील पेंटिंग्ज चिमुकल्यांनी मेलानिया यांना भेट दिली. नैसर्गिक रंगांचा वापर आणि वैशिष्ट्यपूर्ण कला म्हणून त्याकडे पाहिले जाते. या पेंटिंग्ज आणि विद्यार्थ्यांसमवेतचा मेलानिया यांचा फोटो मंगळवारी व्हायरल झाला.