खासदाराने भडकावली अधिकाऱ्याच्या श्रीमुखात
By admin | Published: November 28, 2015 12:20 AM2015-11-28T00:20:20+5:302015-11-28T00:20:20+5:30
बोर्डिंग बंद झाल्यानंतर विमानात बसू देण्याची विनंती फेटाळली म्हणून आंध्र प्रदेशच्या एका खासदाराने एअर इंडियाच्या स्टेशन व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्याची संतापजनक
नवी दिल्ली : बोर्डिंग बंद झाल्यानंतर विमानात बसू देण्याची विनंती फेटाळली म्हणून आंध्र प्रदेशच्या एका खासदाराने एअर इंडियाच्या स्टेशन व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्याची संतापजनक घटना तिरुपती विमानतळावर गुरुवारी घडली.
वायएसआर काँग्रेस पार्टीचे एक खासदार दिल्लीला जाण्यासाठी नातेवाईकांसह ‘एआय ५४१’ हे विमान सुटण्याच्या अवघ्या २० ते २५ मिनिटांपूर्वी तिरुपती विमानतळावर पोहोचले. देशांतर्गत प्रवासासाठी विमानतळावरील बोर्डिंग कक्ष विमान उड्डाणाच्या ४५ मिनिटांपूर्वीच बंद केले जातात. दुपारी २.३० वाजता सुटणाऱ्या विमानासाठी खासदार व त्यांचे नातेवाईक विमानतळावर दाखल झाले त्यावेळी बोर्डिंग कक्ष बंद झाले होते. त्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही. आम्हाला विमानात बसू द्या, अशी विनंती खासदाराने स्टेशन व्यवस्थापकाला केली; परंतु बोर्डिंग कक्ष बंद झाल्याने आता विमानात बसता येणार नाही, असे सांगून व्यवस्थापकाने असमर्थता दर्शविली आणि खासदाराची माफीही मागितली. आपल्याला मनाई केल्याचे पाहून खासदार महोदय संतापले आणि त्यांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. (लोकमत न्यूज नेटवर्क)