महिलांप्रमाणे साडी नेसून पुरुष करतात गरबा; 200 वर्षे जुनी परंपरा, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 02:55 PM2024-10-03T14:55:56+5:302024-10-03T14:56:57+5:30
Men Performs Garba Dress Up As Women: नवरात्रीच्या नऊ दिवस देशभरात मोठ्या उत्साहात गरबा खेळला जातो.
Men Performs Garba Dress Up As Women: आजपासून(3 ऑक्टोबर) शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. देशातील कोट्यवधी भाविक पुढील 9 दिवस देवीच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली पाहायला मिळणार आहे. या नऊ दिवसांत देशभरात अनेक ठिकाणी गरबाचे आयोजन केले जाते. गरबा खेळण्यासाठी भाविकांचीही मोठी गर्दी होते.
या गरबाची सुरुवात गुजरातमधून झाली आहे. गुजरातमध्ये या नऊ दिवस जवळपास सर्वजण गरबा खेळताना पाहयाल मिळतात. साधारणपणे स्त्री-पुरुष एकत्र गरबा खेळतात. किंवा महिला-महिला आणि पुरुष-पुरुषदेखील गरबा खेळताना दिसतात. पण, आम्ही तुम्हाला एका अशा गरबाबद्दल सांगणार आहोत, ज्यात पुरुष महिलांचे कपडे घालून गरबा खेळतात. यामागे सूमारे दोनशे वर्षांची परंपरा आहे.
गुजरातमध्ये अनोखा गरबा
नवरात्रीच्या काळात तुम्ही महिलांना गरबा खेळताना पाहिलेच असेल, पण गुजरातच्या शाहपूर भागात पुरुष महिलांचे कपडे घालून गरबा खेळताना पाहायला मिळतात. गुजरातची राजधानी अहमदाबादमधील शाहपूर भागातील साधू माता गली आणि अंबा माता मंदिरात नवरात्रीदरम्यान पुरुष साडी घालून गरबा खेळतात. नवरात्रीच्या आठव्या दिवशी परिसरातील सर्व पुरुष महिलांसारखी वेषभूषा करुन गरबा खेळतात. त्यांना पाहण्यासाठी दुरुन लोक येतात.
200 वर्षे जुनी परंपरा
गुजरातमध्ये नवरात्रीदरम्यान बरौत समाजातील पुरुष साडी नेसून शाहपूर परिसरात गरबा खेळतात. सुमारे 200 वर्षांपासून ही परंपरा या भागात सुरू असल्याचे जाणकार सांगतात. यामागची कथा अशी आहे की, बरौत समाजातील पुरुषांना सदूबा नावाच्या महिलेने शाप दिला होता. हा शाप टाळण्यासाठी ते नवरात्रीत साडी नेसून गरबा खेळतात. त्याला शेरी गरबा म्हणतात आणि हे नवरात्रीच्या आठव्या दिवशीच केले जाते. या समाजाशी संबंधित लोकांचा विश्वास आहे की, असे केल्याने त्यांच्या समाजावर कोणतीही समस्या किंवा आपत्ती येत नाही.