शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा, निकालामुळे मानसिक तणाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 03:23 PM2022-09-08T15:23:48+5:302022-09-08T15:25:12+5:30
देशातील ६वी ते १२वी इयत्तेतील ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबद्दल काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना शालेय जीवन व शिक्षणात काहीतरी कमतरता असल्याचे जाणवत राहते. ते त्या वातावरणात दबून जातात.
नवी दिल्ली : देशातील शालेय विद्यार्थ्यांपैकी ८१ टक्के विद्यार्थी अभ्यास, परीक्षा, निकाल यामुळे मानसिक तणावाखाली असतात. हा त्रास माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना जास्त जाणवतो. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) या संस्थेने नुकत्याच केलेल्या पाहणीत हा निष्कर्ष काढण्यात आला.
देशातील ६वी ते १२वी इयत्तेतील ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबद्दल काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना शालेय जीवन व शिक्षणात काहीतरी कमतरता असल्याचे जाणवत राहते. ते त्या वातावरणात दबून जातात.
ऑनलाइन पद्धतीने जे शिकविले जाते ते ५१ टक्के विद्यार्थ्यांना नीट उमजत नाही. शिक्षकांनी शिकविलेला धडा समजून घेण्यात त्यांना काही अडचणी येतात.
३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत करण्यात आलेल्या या पाहणीत ३.७९ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. असे एनसीईआरटीने केलेल्या पाहणीच्या निष्कर्षात म्हटले आहे.
शिक्षकांनी पुढाकार घेणे अपेक्षित
केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केले आहे. त्यातील तरतुदींनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम रितीने कसे शिकवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. शिक्षकांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा बारकाईने वाचावा व त्यातील गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणे केंद्र सरकारला अपेक्षित आहे.
सर्वेक्षण का केले?
केंद्र सरकारने शिक्षक पर्व दरम्यान घेतलेल्या अनेक उपक्रमांसह हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. कोरोना महामारीनंतर देशातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्राने केलेले हे पहिले सर्वेक्षण आहे. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आणि शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक पर्व साजरे केले जात आहे.