मोदींना संसदेवरील हल्ल्याची आठवण; छातीवर गोळ्या झेलणाऱ्या जवानांच्या स्मृतींना नमन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 01:13 PM2023-09-18T13:13:09+5:302023-09-18T13:14:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पंडित नेहरू यांची प्रारंभिक मंत्रिपरिषद होती.
नवी दिल्ली - संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. ५ दिवसीय अधिवेशनाचा पहिला दिवस जुन्या संसदेतील शेवटचा दिवस ठरणार आहे. गणेशोत्सवापासून म्हणजे उद्यापासून संसदेचे कामकाज नव्या इमारतीतून सुरू केले जाईल. संसदेच्या या भावनिक क्षणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या संसद सभागृहातील अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदींनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा विशेष उल्लेख केला. तर, देशाच्या संसदेवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करताना शहिदांना नमनही केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पंडित नेहरू यांची प्रारंभिक मंत्रिपरिषद होती. बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री होते. जगातील सर्वोत्तम संविधान निर्माण करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले. नेहरूंच्या कारकिर्दीत वॉटर पॉलिसी बनवण्यासाठी योगदान दिले. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायासाठी सातत्याने प्रयत्न केले. लाल बहादुर शास्त्री यांनी १९६५ च्या युद्धात जवानांचे मनोबल याच सभागृहातून वाढवले होते. हरितक्रांतीसाठी याच सभागृहातून पहिले पाऊल उचलले. याच सभागृहात ग्रामीण विकास मंत्रालयाची स्थापना केली गेली. याच सभागृहात मतदानाचे वय १८ करण्यात आले. पंडित नेहरू, शास्त्री यांच्यापासून अटल बिहारी आणि मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्वांनी देशाला नवीन दिशा दिली, असे मोदींनी म्हटले. मोदींच्या या भाषणावर सर्वच सदस्यांनी बाक वाजवून दाद दिली.
#WATCH | Special Session of Parliament | In Lok Sabha, PM Modi says, "There was a terror attack (on the Parliament). This was not an attack on a building. In a way, it was an attack on the mother of democracy, on our living soul. The country can never forget that incident. I also… pic.twitter.com/QL4RN09BM9
— ANI (@ANI) September 18, 2023
देशासाठी, देशवासीयांसाठी आपण सर्वजण चांगलं काम करू शकू, वेगाने काम करू शकू, यासाठी कित्येक देशावासीयांनी आपलं योगदान दिलंय. त्या सर्वांचं मी व्यक्तीश: आणि संसदेच्यावतीनेही आभार मानतो, त्यांना नमन करतो, असे मोदींनी म्हटले. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. आपल्या संसदेवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. हा हल्ला एका इमारतीवर नव्हता, जगभरातील आपल्या जीवात्मावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. हा देश संसदेवरी तो हल्ला कधीही विसरणार नाही. मात्र, दहशतवाद्यांसोबत लढता लढता ज्या वीर पुत्रांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या त्यांनाही मी आज नमन करतो.
पत्रकारांच्या ताकदीही आठवण
आज जेव्हा आपण या सदनातून बाहेर पडत आहोत, तेव्हा मला त्या पत्रकारांचीही आठवण करावीशी वाटते, ज्यांनी इथे वार्तांकन केले आहे, आतल्या बातम्या देण्याची त्यांची क्षमता होती आणि आत मधल्या आतच्या बातम्याही, त्यांचे कार्य विसरता येणार नाही. बातमीसाठी नव्हे, तर भारताच्या विकासाच्या प्रवासासाठी त्यांनी सर्वस्व खर्च केले, त्यांची आठवण ठेवण्याची वेळ आली आहे - इथल्या भिंतींची जशी ताकद आहे, तसाच आरसाही त्यांच्या लेखणीत आहे. आज हे सदन सोडणे हा अनेक पत्रकार बांधवांसाठी भावनिक क्षण असावा असंही मोदी यांनी सांगितले. आज आपल्याला इतिहास आणि भविष्य दोघांमधला दुवा बनण्याचं भाग्य मिळाले असंही त्यांनी आर्वजून सांगितले.