टेस्ट ड्राइव्हला नेलेली मर्सिडीज पळवणा-या पिता-पुत्राला अटक
By admin | Published: June 22, 2016 01:04 PM2016-06-22T13:04:12+5:302016-06-22T13:04:12+5:30
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने आलिशान मर्सिडीज बेन्झ गाडी पळवणा-या पिता-पुत्राच्या जोडीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने आलिशान मर्सिडीज बेन्झ गाडी पळवणा-या पिता-पुत्राच्या जोडीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम दिल्लीतील राजौरी गार्डनजवळ असणा-या शो रुममधून त्यांनी मर्सिडीज कारची चोरी केली होती. या मर्सिडीजची किंमत ४० लाख रुपये आहे.
मागच्या महिन्यात सहा मे रोजी अनिल आनंद (५४) आणि त्याचा २३ वर्षांचा मुलगा साहील आनंद मर्सिडीज गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने शो रुममध्ये गेले. त्यावेळी आणखी एक व्यक्ती त्यांच्यासोबत होती. टेस्ट ड्राइव्हसाठी म्हणून त्यांनी गाडी चालवायला घेतली.
पण टेस्ट ड्राइव्हसाठी गेलेले तिघेही परतले नाहीत. शो रुमच्या कर्मचा-यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर अनेक तास वाट पाहिल्यानंतर सेल्स मॅनेजर दीपक कुमार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
सोमवारी पोलिसांना दोन्ही आरोपी गुरगाव येथून त्याच मर्सिडीजमधून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांनी गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर बदलला होता.