राजकीय पक्षांकडून भाषांचे नुसतेच राजकारण; कर्नाटकमध्ये पंतप्रधानांची विराेधकांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 09:19 AM2023-03-26T09:19:45+5:302023-03-26T09:20:23+5:30
कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी ‘श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च’चे उद्घाटन केले.
चिक्कबल्लापूर/बंगळुरू : राजकीय पक्षांनी भारतीय भाषांच्या विकासासाठी काहीही केले नाही, केवळ भाषिक राजकारण केले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. खेड्यातील तसेच गरीब व मागासवर्गीय समुदायातील विद्यार्थ्यांनी शिकून डॉक्टर, इंजिनिअर होऊ नये, असे या राजकीय पक्षांना वाटते, अशी टीकाही मोदी यांनी केली.
कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी ‘श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च’चे उद्घाटन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या दौऱ्यात मोदी यांनी बंगळुरूमधील नव्या मेट्रो लाईनचेही उद्घाटन केले तसेच रोड शोदेखील केला. कर्नाटकसह दक्षिण भारतातील प्रादेशिक पक्षांच्या भाषिक राजकारणाला लक्ष्य करताना मोदी यांनी म्हटले की, काही राजकीय पक्ष हे आपला राजकीय स्वार्थ व व्होट बँकेच्या राजकारणासाठी भाषेवरून खेळ खेळत आले आहेत. मात्र, या भाषांना पाठबळ देण्यासाठी आवश्यक प्रयत्न त्यांनी केलेले नाहीत. कन्नड ही एक वैभवशाली भाषा आहे. परंतु, कन्नडमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच तंत्रज्ञानविषयक शिक्षण देण्यासाठी आधीच्या सरकारांनी काहीही केले नाही. आपल्या सरकारने कन्नडसह सर्व भारतीय भाषांत वैद्यकीय शिक्षणाची सोय केल्याचे माेदी म्हणाले. (वृत्तसंस्था)