पाक अयशस्वी! जम्मूत IED स्फोट घडविण्यासाठी पाकिस्तानमधून मेसेज; पुलवामाच्या सोहेलची कबुली
By पूनम अपराज | Published: February 14, 2021 06:04 PM2021-02-14T18:04:37+5:302021-02-14T18:05:45+5:30
Big Action in Jammu and Kashmir रघुनाथ मंदिर, लखदत्त बाजार आणि जम्मू रेल्वे स्टेशन दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये होते.
पुलवामा हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण होत असताना आज दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट रचला गेला होता. जम्मू बसस्थानकातून सुमारे ७ किलो आयईडी (स्फोटक) जप्त करण्यात आले. याप्रकरणी संशयित युवकास ताब्यात घेण्यात आले आहे. पकडलेला तरुण चंदीगडमधील नर्सिंगचा विद्यार्थी आहे. आयईडी पसरवण्यासाठी त्याला पाकिस्तानकडून संदेश मिळाल्याचे बोलले जात आहे.
ही सर्व माहिती जम्मू काश्मीर पोलिस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आयईडी जप्ती प्रकरणात बोलताना जम्मू झोनचे आयजीपी मुकेश सिंह म्हणाले की, अनंतनाग आणि जम्मू पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. आम्ही गेल्या २ ते ३ दिवसांपासून हाय अलर्टवर होतो. आमच्याकडे आधीपासूनच इनपुट होते की, पुलवामा हल्ल्याच्या दिवशी दहशतवादी कोणताही मोठा हल्ला करण्याचा विचार करीत आहेत. अशा परिस्थितीत तपासादरम्यान आम्ही चंदिगडमध्ये शिकत असलेल्या नर्सिंग विद्यार्थिनी सोहेलला अटक केली आहे. ६ ते ६.५ किलो आयईडी हस्तगत करण्यात आला आहे. आयजीपी पुढे म्हणाले की, पंजाबमध्ये शिकणारे काही काश्मिरी विद्यार्थ्यांचा दहशतवादी वापर करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमधून सोहेल नावाच्या संशयित युवकास अटक करण्यात आली आहे. तो दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील आहे. आयजीपी म्हणाले की, अटक केलेला आरोपी सोहेल हा चंडीगडमध्ये शिकतो आणि चौकशीत पाकिस्तानच्या अल बद्र तंजीमकडून आयईडी प्लांट करण्याचा संदेश मिळाला होता.
Breaking : दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला; जम्मू बस स्टॅण्डवर ७ किलो स्फोटकं केली जप्त
आयएडी लावण्यासाठी सोहेलला तीन ते चार ठिकाण टार्गेट म्हणून नेमून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तो श्रीनगरला जाण्यासाठी पळ काढणार होता, तिथे अल बद्र तंजीमचे ओव्हर ग्राऊंड दहशतवादी अथर शकील खान त्याला भेटणार होता. रघुनाथ मंदिर, लखदत्त बाजार आणि जम्मू रेल्वे स्टेशन दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये होते.
Pulwama Attack: बिठाकर पास बच्चों को जो कल किस्से सुनाता था... व्हिडीओ शेअर करत लष्करानं दिली जवानांना श्रद्धांजली
आयजी मुकेश सिंह म्हणाले की, चंडीगड येथील काझी वसीम नावाच्या व्यक्तीलाही या प्रकरणाची माहिती होती, तोही पकडला गेला आहे. यासह अबिद नबी नावाच्या व्यक्तीलाही पकडण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये होते. काल रात्री सांबा जिल्ह्यात ६ पिस्तूल आणि १५ लहान आयईडी ताब्यात घेण्यात आले.