व्हीआयपी संस्कृतीला निरोप, ईपीआय संस्कृतीला रुजवा
By admin | Published: May 1, 2017 03:59 AM2017-05-01T03:59:32+5:302017-05-01T03:59:41+5:30
काही लोकांच्या मनात रुतून बसलेल्या व्हीआयपी संस्कृतीला काढून टाकून त्याऐवजी ईपीआय (एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट) संस्कृती
नवी दिल्ली : काही लोकांच्या मनात रुतून बसलेल्या व्हीआयपी संस्कृतीला काढून टाकून त्याऐवजी ईपीआय (एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट) संस्कृती रुजविण्यासाठी लाल दिव्यांवर बंदी घातल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. १ मेपासून लाल दिवे वाहनांवरून काढून टाकले जातील.
लाल दिवे हे अति महत्त्वाची व्यक्ती संस्कृतीचे जणू प्रतीक बनले होते. त्यामुळे ते दिवे वापरणाऱ्यांच्या मनात इतरांबद्दल तुच्छतेची भावना निर्माण झाली होती. या देशातील सगळे १२५ कोटी लोक हे समान दर्जाचे व महत्त्वाचे आहेत, असे मोदी रविवारी आपल्या मासिक ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात म्हणाले.
१ मेपासून लाल दिवे वापरण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्यमंत्री, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती यांच्यासह सगळ्या सरकारी वाहनांना लागू आहे.
वाहनावर एकदा लाल दिवा लागला की, ते व्हीआयपी संस्कृती प्रतीक बनतो व ती संस्कृती मग ते वापरणाऱ्यांच्या डोक्यात जाते, असे मोदी म्हणाले. डोक्यात गेलेली व्हीआयपी संस्कृती काढण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डिजिटल पेमेंटस्चा आग्रह धरताना मोदी म्हणाले की, युवकांनी कॅश रिवार्डस् दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा. भारत इंटरफेस फॉर मनी अॅपचा (भीम) वापर करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देणाऱ्यांना हे कॅश रिवार्डस् दिले जातात. ही योजना १४ आॅक्टोबरपर्यंत सुरू आहे. जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भीम अॅप वापरण्यास सांगेल व त्या व्यक्तीने तीन व्यवहार डिजिटल केल्यानंतर त्या प्रत्येक वेळी त्याला दहा रुपये कमावता येतील.
मोठी स्वप्ने पूर्ण करता येतील
सरकारच्या ‘नवा भारत’ संकल्पनेत व्हीआयपीऐवजी ईपीआय संस्कृतीला महत्त्व दिले जाईल. १२५ कोटी लोकांच्या शक्तीला ओळखले, तर मोठी स्वप्ने पूर्ण करता येतील, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी या उन्हाळी सुट्यांचा उपयोग नवी कौशल्ये शिकण्यासाठी करण्याचे व चौकटीबाहेरचा विचार करण्याचे आवाहन केले. नवी भाषा शिका किंवा नव्या ठिकाणी जा, अशी त्यांची सूचना होती. मागच्या ‘मन की बात’मध्ये मी अन्न वाया जाऊ न देण्याबद्दल बोललो होतो. त्याला अनेक सूचनांनी लोकांनी प्रतिसाद दिला, असे मोदी यांनी सांगितले. हवामान बदलाचा प्रश्न आणि वाढता उन्हाळा याबद्दलही त्यांनी सांगितले.