68 वर्षांनी भेटले अन् लागल्या अश्रूंच्या धारा; भारत-पाकिस्तानमधील फाळणीच्या वेदनांची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 08:01 AM2023-08-08T08:01:07+5:302023-08-08T08:01:32+5:30
१९४७ मध्ये फाळणीच्या वेळी सकिना यांचे कुटुंब जसोवाल, लुधियाना येथे राहत होते. फाळणीनंतर ते पाकिस्तानात स्थलांतरित झाले.
अमृतसर : भारत-पाकिस्तानमधील फाळणीच्या वेदनांची आणखी एक कहाणी श्री करतारपूर साहिब गुरुद्वारामध्ये पाहायला मिळाली. पाकिस्तानातील शेखपुरा येथील ६८ वर्षीय सकिना या त्यांच्या जन्मानंतर प्रथमच श्री करतारपूर साहिब येथे त्यांचा ८० वर्षीय भाऊ गुरमेल सिंग यांना भेटल्या आणि त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी एकमेकांना फक्त छायाचित्रांमध्ये पाहिले होते.
१९४७ मध्ये फाळणीच्या वेळी सकिना यांचे कुटुंब जसोवाल, लुधियाना येथे राहत होते. फाळणीनंतर ते पाकिस्तानात स्थलांतरित झाले. वडिलांचे नाव वली मोहम्मद आणि आजोबांचे नाव जामू. सकिना यांनी सांगितले की, कुटुंब पाकिस्तानात आले; पण त्यांची आई भारतातच राहिली. स्वातंत्र्याच्या वेळी बेपत्ता झालेले लोक एकमेकांना परत केले जातील, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला होता. त्यानंतर वडिलांनी पाकिस्तान सरकारकडे मदत मागितली.
त्यांच्या आईला घेण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे जवान जसोवाल गावात पोहोचले, तेव्हा ५ वर्षांचा भाऊ खेळायला गेला होता. आईने भावाला हाक मारली; पण तो जवळपासही नव्हता. पाक लष्कराने सांगितले की, ते आता थांबू शकत नाहीत आणि भाऊ भारतातच राहिला. सकिना यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर १९५५ मध्ये पाकिस्तानात झाला.
पहिल्यांदा भाऊ समोर दिसला...
n यानंतर सकिना आणि त्यांचा भाऊ गुरमेल यांच्या कुटुंबीयांनी श्री करतारपूर साहिब येथे भेटण्याचे ठरवले. गुरमेल आपल्या बहिणीला श्री करतारपूर साहिब येथे पहिल्यांदा भेटले.
n आता त्यांना आशा आहे की, दोन्ही देशांची सरकारे त्यांना व्हिसा देतील; जेणेकरून दोन्ही भाऊ-बहीण त्यांच्या आयुष्यातील काही दिवस एकमेकांसोबत घालवू शकतील.
अशी झाली भेट...
सकिना म्हणाल्या की, सुरुवातीला त्यांचा भाऊ कुटुंबाला पत्र पाठवू लागला. सकिना यांना कळायला लागल्यावर वडिलांनी त्यांना एक भाऊ आहे, असे सांगून त्याचा फोटो दाखवला. सकिना यांच्या जावयाला ही गोष्ट कळताच त्यांनी त्यांच्या भावाला शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. पाकिस्तानमधील यू-ट्यूब चॅनेलने सकिनासोबत ठेवलेल्या काही पत्रांच्या मदतीने भारतातील पंजाबमध्ये शोध सुरू केला.