द्वेषपूणर्ण भाषणांच्या जाहिरातींमधून मेटाची बक्कळ कमाई; वाईट प्रचार, द्वेषपूर्ण भाषण आणि हिंसाचाराला प्रोत्साहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 09:13 AM2024-05-24T09:13:47+5:302024-05-24T09:16:17+5:30
फेसबुकने भारतातील एका समाजाविरुद्ध अपमानास्पद भाषा असलेल्या जाहिरातींना मान्यता दिली आहे, असे अभ्यासात समोर आले.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर होण्याची भीती खरी ठरली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे संचालन करणारी कंपनी मेटा ही निवडणुकीत होणारा वाईट प्रचार, द्वेषपूर्ण भाषण आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या एआय निर्मित फोटो असलेल्या जाहिराती शोधण्यात आणि ब्लॉक करण्यात अपयशी ठरली आहे. यातून कंपनीला मोठा फायदा झाला आहे. ‘एको’ ने केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. देशात सार्वत्रिक निवडणुका सुरू असताना अभ्यासाचे हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
फेसबुकने भारतातील एका समाजाविरुद्ध अपमानास्पद भाषा असलेल्या जाहिरातींना मान्यता दिली आहे, असे अभ्यासात समोर आले. या किड्याला जाळून टाकू, हिंदू रक्त पसरतेय, या आक्रमण करणाऱ्यांना जाळून टाकायला हवे, अशा शब्दांचा वापर जाहिरातींमध्ये करण्यात आला. काही नेत्यांनी द्वेषपूणर्ण प्रचार करत वर्चस्ववादी भाषा वापरली, असे दिसून आले.
कलाकारांचे जाळेही आले समोर
अनेक राजकीय पक्ष दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर प्रचंड पैसा खर्च करण्यास तयार आहेत. यापैकी बहुतेक जाहिरातींनी त्यांच्या धोरणांचे उल्लंघन केल्याचे मेटाने नाकारले आहे. द्वेषपूर्ण जाहिरातींचा निवडणुकीचे हत्यार म्हणून वापर करणाऱ्या कलाकारांचे जाळेही या दरम्यान उघड झाले आहे. याचा थेट आर्थिक फायदा मेटाला झाला.
मेटाने ८ मे ते १४ मे दरम्यान अत्यंत भडक जाहिरातींना मंजुरी दिली. या जाहिरातींमध्ये अल्पसंख्याकांना टार्गेट करण्यात आले होते असेही या अहवालात समोर आले.
पुरेसे पुरावे असूनही...
- गृहमंत्र्यांचा व्हिडीओ मॉर्फ करून एक जाहिरात करण्यात आली होती, यात मागासवर्गीयांसाठी बनवलेली धोरणे रद्द करण्याची धमकी देण्यात आली होती.
- त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांना नोटिसा देऊन अटक करण्यात आली. अशा प्रत्येक जाहिरातीमध्ये एआय टूल्सचा वापर करून फोटो तयार करण्यात आले होते.
- चुकीची माहिती पसरवण्यासाठी एआय निर्मित साहित्याचा वापर आम्ही रोखू आणि असे साहित्य शोधून ते काढून टाकू, असे आश्वासन मेटाने निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र पुरेसे पुरावे असूनही मेटाने कोणतीही कारवाई केली नाही.
यापूर्वीही हिंसाचार भडकविण्यास हातभार
- निवडणुकीतील चुकीची माहिती आणि षड्यंत्र सिद्धांतांचा प्रसार सोपा करून मेटाने अमेरिका आणि ब्राझील प्रमाणेच भारतात जातीय संघर्ष आणि कधी कधी हिंसाचार भडकविण्यास हातभार लावला आहे.
- २०२० मध्ये, जेव्हा दिल्ली दंगलीत ५० हून अधिक लोक मारले गेले, तेव्हा फेसबुकने द्वेषयुक्त सामग्री आणि हिंसाचाराला प्रोत्साहन दिले होते, असे अहवालात म्हटले आहे.