२० महिला पत्रकार देणार साक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 06:19 AM2018-10-18T06:19:34+5:302018-10-18T06:20:10+5:30
एम.जे. अकबर यांच्यावरील लैंगिक छळाचे आरोप : इंग्रजी वृत्तपत्राचा संपादक गेला रजेवर
नवी दिल्ली : महिला पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर माजी वरिष्ठ पत्रकार आणि सध्याचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांच्यावर जो अब्रूनुकसानीचा दावा केला आहे, त्या प्रकरणात अकबर यांच्या विरोधात साक्ष देण्यास देशातील २0 महिला पत्रकारांनी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अकबर यांच्या अडचणी वाढण्याचीच शक्यता दिसत आहे.
यामिनी नायर या महिला पत्रकाराने आपल्या वरिष्ठाविरोधात ‘द हिंदू’ या वृत्तपत्रातील वरिष्ठाविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली आहे. त्यानंतर या वृत्तपत्राचे निवासी संपादक गौरीसदन नायर रजेवर गेले आहेत. यामिनी नायर यांनी तक्रारीत त्यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता; मात्र यामिनी नायर यांच्या तक्रारीची आम्ही दखल घेतली असून, या प्रकरणाची लगेच चौकशी सुरू करीत असल्याचे ‘द हिंदू पब्लिशिंग’ ग्रुपचे चेअरमन एन. राम यांनी म्हटले आहे. गौरीसदन नायर डिसेंबरमध्ये निवृत्त होत आहेत.
अकबर यांच्याविरोधात साक्ष देण्याची तयारी देणाऱ्या महिला पत्रकारांनी म्हटले आहे की, प्रिया रमानी या एकट्या नसून, आम्ही सर्व त्यांच्यामागे ठामपणे उभ्या राहत आहोत. त्यांच्याविरोधात अकबर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या सुनावणीमध्ये आमचेही म्हणणे न्यायालयाने ऐकून घ्यावे. आमच्यापैकी काही जणींना अकबर यांच्याकडून लैंगिक छळाचा सामना करावा लागला आहे. प्रिया रमानी यांनी ‘द एशियन एज’ या वृत्तपत्रात अकबर यांच्यासह काम करीत असताना, लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता, असे मी टू मोहिमेद्वारे म्हटले होते.
जतीन दास यांच्यावर झाला आरोप
प्रख्यात चित्रकार जतीन दास यांच्यावरही एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. नीशा बोरा यांनी म्हटले आहे की, काही काळ आपण त्यांच्यासह काम करीत होतो. त्यावेळी त्यांनी आपले जबरदस्तीने चुंबन घेतले होते. त्यानंतर आपण त्यांच्यासह काम करणे बंद केले. जतीन दास यांनी आरोपाचा इन्कार केला आहे; मात्र त्यांची कन्या व अभिनेत्री नंदिता दास यांनी मी टू मोहिमेला पाठिंबा दिला आहे. त्या म्हणाल्या की, या प्रकरणातील तथ्यही सर्वांच्या समोर यायला हवे.