#MeToo : एम.जे.अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार - अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 10:05 AM2018-10-13T10:05:40+5:302018-10-13T10:17:39+5:30
लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक आणि आताचे परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. याप्रकरणाची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे.
नवी दिल्ली - लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक आणि आताचे परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. अनेक महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याप्रकरणाची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गांभीर्यानं दखल घेतली असून अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय, करण्यात आलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते पाहणे आवश्यक असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. खुद्द अमित शहा यांनीच चौकशीचे आश्वासन दिले असल्यानं अकबर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
आतापर्यंत सात महिला पत्रकारांनी अकबर यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. यापूर्वी बलात्काराच्या आरोपावरुन निहालचंद मेघवाल यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते.
या आहेत सात जणी :
एम.जे. अकबर यांच्याविरोधात पहिली तक्रार प्रिया रमणी यांनी केली होती. त्यानंतर गझला वहाब, साबा नकवी, शुतापा पॉल, शुभा राहा, सुपर्णा शर्मा व प्रेरणा सिंग बिंद्रा यांनीही अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या आहेत. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्या हाताखाली काम केले आहे.
दरम्यान, अकबर यांच्या राजीनाम्यासाठी भाजपातूनच दबाव वाढत आहे. मनेका गांधी यांनी या तक्रारींची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनीही तीच मागणी केली. अर्थात अकबर यांनीच त्यावर बोलणे उचित ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
काय म्हणाल्या होत्या स्मृती इराणी?
महिलांना अशा विषयांवर बोलणेच अवघड असते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, नियमित पगारासाठी आणि सन्मानपूर्वक जगण्यासाठी त्या नोकरी करतात. त्यामुळे अशा महिलांना पाठिंबा आणि न्याय मिळणे आवश्यकच आहे, असे इराणी म्हणाल्या.
(#MeToo : लैंगिक शोषणाविरुद्ध केंद्र सरकार नेमणार समिती - मनेका गांधी)
महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण तापत चालले असून, अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी न्यायाधीश व कायदेतज्ज्ञ यांची समिती नेमण्याची घोषणा केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणांचा थेट उल्लेख न करता, रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांना संरक्षण देईन व स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी प्रयत्न करेन, असे जाहीर केले.
नाना पाटेकर, परराष्ट्र राज्यमंत्री एम. ज. अकबर, साजिद खान यांच्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्या विरोधात विविध क्षेत्रांतील महिलांनी ‘मीटू’मोहीमच सुरू केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला.
मनेका गांधी यांनी ही प्रकरणे लावून धरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अकबर यांना राजीनामा द्यावा लागेल, असे दिसते.