#MeToo : लैंगिक शोषणाविरुद्ध केंद्र सरकार नेमणार समिती - मनेका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 04:37 AM2018-10-13T04:37:58+5:302018-10-13T04:38:26+5:30
महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण तापत चालले असून, अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी न्यायाधीश व कायदेतज्ज्ञ यांची समिती नेमण्याची घोषणा केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी केली.
नवी दिल्ली : महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण तापत चालले असून, अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी न्यायाधीश व कायदेतज्ज्ञ यांची समिती नेमण्याची घोषणा केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणांचा थेट उल्लेख न करता, रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांना संरक्षण देईन व स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी प्रयत्न करेन, असे जाहीर केले.
नाना पाटेकर, परराष्ट्र राज्यमंत्री एम. ज. अकबर, साजिद खान यांच्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्या विरोधात विविध क्षेत्रांतील महिलांनी ‘मीटू’मोहीमच सुरू केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला.
मनेका गांधी यांनी ही प्रकरणे लावून धरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अकबर यांना राजीनामा द्यावा लागेल, असे दिसते. ते नायजेरियाहून गयाना येथे गेले आहेत. ते बहुधा रविवारी परततील.
बॉलीवूडमध्येही लैंगिंक शोषणाविरुद्ध आवाज उठत आहे. ‘हाऊसफुल्ल-४’ चे दिग्दर्शक साजिद खान यांना डच्चू देण्यात आला. त्यांच्यावरही दोन महिलांनी शोषणाचा आरोप केला आहे. अक्षयकुमारने आपण साजिद खानसोबत काम करणार नाही, असे जाहीर केले. त्याच्या इशा-यामुळे खळबळ माजली. त्यामुळे आपण चित्रपटातून बाहेर पडत असल्याचे साजिदने जाहीर केले. नानाही चित्रपटात नसतील, हे नंतर स्पष्ट झाले.
नानाचा मुलगा मल्हार याने रात्री उशिरा सांगितले की, नानानी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हेच निर्माते इतर कलाकार यांच्यासाठी हिताचे असल्याचे नानानी सांगितले आहे. त्यांनी या चित्रपटाच्या सदस्यांना शुभेच्छाही दिल्या.
परदेशी महिलेचा अकबरवर आरोप
एम. जे. अकबर यांच्यावर माजिल ड पुय कॅम्प या परदेशी महिला पत्रकाराने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
तिने म्हटले आहे की, अकबर हे माझ्या पालकांच्या परिचयाचे होते. त्यामुळे मी २00७ साली, वयाच्या १८व्या वर्षी एशियन एजमध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून काम सुरू केले.
तिथे त्यांनी मला बाहुपाशात खेचून माझे चुंबन घेतले होते. मी त्यांना विरोध करीत असतानाही त्यांनी मला जुमानले नाही, असे तिने म्हटले आहे. ती सध्या सीएनएनमध्ये काम करते.
हातून गेला ‘हाऊसफुल्ल’
‘हाऊसफुल्ल-४’चे दिग्दर्शक साजिद खान व अभिनेते नाना पाटेकर यांना अक्षय कुमारच्या इशाºयामुळे चित्रपटामधून बाहेर पडावे लागले.