#Metoo: हिमानी शिवपुरीचाही आलोकनाथ यांच्यावर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 06:44 IST2018-10-14T06:41:50+5:302018-10-14T06:44:07+5:30
आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांच्याविरोधात आलोकनाथ यांच्या पत्नी आशू सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

#Metoo: हिमानी शिवपुरीचाही आलोकनाथ यांच्यावर आरोप
मुंबई : आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांच्याविरोधात आलोकनाथ यांच्या पत्नी आशू सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र त्याचवेळी आता आलोकनाथ यांच्या गैरवर्तणुकीबद्दल अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी धक्कादायक खुलासा केला.
शिवपुरी यांनी आलोकनाथ दारूच्या नशेत त्यांच्या खोलीत आले होते असे म्हटले आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते माझ्या खोलीत दारू पिऊन आले आणि मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचा अवतार पाहून मी त्यांना खोलीच्या बाहेर जाण्यास सांगितले. पण ते ऐकत नव्हते. मी आरडाओरडा केला. तेव्हा सगळे जमा झाल्यावर आलोकनाथ निघून गेले. शिवपुरी यांनी आलोकनाथ यांच्यासोबत ‘परदेस’ आणि ‘हम आपके है कौन’ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सिमरन कौरनेही केले साजिदवर आरोप अभिनेत्री सिमरन कौर सुरी हिने साजिद खानने गैरवर्तणूक केल्याचे म्हटले आहे.
२०११ साली ‘हिम्मतवाला’ चित्रपटातील भूमिकेसाठी साजिदने स्वत:हून फोन करून आॅडिशनसाठी बोलावले होते. त्या वेळी त्याने मला कपडे काढण्यास सांगितले, अशी माहिती तिने एका खासगी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत दिली. चित्रपटात भूमिका द्यायची असल्यास मला अभिनेत्रीचे शरीर पाहणे आवश्यक असते, असे साजिदने सांगितले. त्याला मी नकार देऊन आवाज वाढवल्यावर आवाज कमी कर. घरात माझी आई आहे, असेही तो म्हणाला.
कंगनाला टोला
विकास बहलच्या ‘क्विन’ चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री कंगना राणावत हिने आरोप केल्यानंतर त्याची पहिली पत्नी रिचा दुबेने कंगनाला रीतसर प्रत्युत्तर दिले आहे. एखाद्या विवाहित किंवा अविवाहित पुरुषावर प्रेम करावे की नाही हा सर्वस्वी एखाद्या महिलेचा निर्णय असतो. हे कंगनाला तर चांगलेच माहिती असावे असा टोला रिचाने लगावला. तर,टी-सीरिजचे प्रमुख भूषण कुमार यांच्यावरदेखील आता गैरवर्तनाचा आरोप झाला आहे. आपल्याला चित्रपटामध्ये आॅफर देत भूषण कुमारने गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे एका महिलेने म्हटले आहे.
रितेश देशमुखचाही अक्षयला पाठिंबा
‘मी टू’च्या पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षयकुमार याने ‘हाऊसफुल-४’ चित्रपटाचे शूटिंग थांबविले आहे. आता अभिनेता रितेश देशमुखनेही या प्रकरणी अक्षयला पाठिंबा दिला आहे. रितेशने आपल्या ट्विटमध्ये ‘या सर्व महिलांच्या व्यथा ऐकून मी स्तब्ध झालो आहे.’ या प्रकरणात सर्वांचे म्हणणे आधी ऐकून घेतले पाहिजे, उगाच मत बनवायला नको,’ असे म्हटले आहे.