#MeToo : एम. जे. अकबर यांचे मंत्रिपद आले धोक्यात!; सात महिला पत्रकारांनी केल्या लैंगिक छळाच्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 06:07 AM2018-10-12T06:07:40+5:302018-10-12T06:07:56+5:30
अनेक महिला पत्रकारांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक व सध्याचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याबरोबरच भाजपा व मोदी सरकारही अडचणीत आले आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : अनेक महिला पत्रकारांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक व सध्याचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याबरोबरच भाजपा व मोदी सरकारही अडचणीत आले आहे. त्यामुळे अकबर आता स्वत:हून राजीनामा देतात की त्यांना डच्चू दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत सात महिला पत्रकारांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. याआधी बलात्काराच्या आरोपावरून निहालचंद मेघवाल यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते.
अकबर सध्या नायजेरियात असून, ते गुरुवारी रात्री वा शुक्रवारी दिल्लीत परततील. त्यांनी या तक्रारींविषयी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपातून दबाव वाढत आहे. याआधी मनेका गांधी यांनी या तक्रारींची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती.
वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनीही तीच मागणी केली. अर्थात अकबर यांनीच त्यावर बोलणे उचित ठरेल, असे त्या म्हणाल्या. महिलांना अशा विषयांवर बोलणेच अवघड असते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, नियमित पगारासाठी आणि सन्मानपूर्वक जगण्यासाठी त्या नोकरी करतात. त्यामुळे अशा महिलांना पाठिंबा व न्याय मिळणे आवश्यकच आहे, असे इराणी म्हणाल्या.
निहालचंद मेघवाल यांच्यावर बलात्काराचा आरोप होताच, त्यांना डच्चू देण्यात आला होता. भाजपा नेत्यांच्या दृष्टीने एम. जे. अकबर हे तर बाहेरून पक्षात आले आहेत. मुस्लीम समाजही त्यांना आपले मानत नाही. केंद्र सरकारला पश्चिम आशियाई देशात मदत व्हावी यासाठी अकबर यांना मंत्री केले. पण त्यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची प्रकरणे बाहेर येत असताना, त्यांचे पदच धोक्यात आले आहे.
अर्थात मंत्रिपदावरून काढण्यापूर्वी अकबर यांना त्यांची बाजू मांडण्याची नक्कीच संधी दिली जाईल, असे एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले. अकबर यांच्याविरोधात ज्या पद्धतीने तक्रारी येत आहेत, ते पाहता, त्यांना सरकारमध्ये ठेवणे योग्य नाही, असे रा. स्व. संघाचेही मत असल्याचे समजते.
या आहेत सात जणी
एम. जे. अकबर यांच्याविरोधात पहिली तक्रार प्रिया रमणी यांनी केली होती. त्यानंतर गझला वहाब, साबा नकवी, शुतापा पॉल, शुमा राहा, सुपर्णा शर्मा व प्रेरणा सिंग बिंद्रा यांनीही अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्या हाताखाली कधी ना कधी काम केले आहे.
पुरुष आपल्या पदाचा अनेकदा गैरवापर करताना आढळतात. चित्रपटसृष्टीप्रमाणे माध्यमे, राजकारण आणि कंपन्यांतील वरिष्ठ अधिकारी असे करत असतात. आता महिला उघडपणे बोलू लागल्या असून, त्यांचे म्हणणे गांभीर्याने घ्यायलाच हवे.
- मनेका गांधी, केंद्रीय मंत्री