#MeToo: एम. जे. अकबर यांची खासदारकी धोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 07:24 AM2018-10-18T07:24:08+5:302018-10-18T07:26:09+5:30

अकबर यांची खासदारकी काढून घ्यावी यासाठी भाजपा नेते आक्रमक

metoo mj akbar may lost rajya sabha seat ahead of election in madhya pradesh | #MeToo: एम. जे. अकबर यांची खासदारकी धोक्यात 

#MeToo: एम. जे. अकबर यांची खासदारकी धोक्यात 

Next

भोपाळ: लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमुळे वादात सापडलेले भाजपा नेते एम. जे. अकबर यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तब्बल 15 महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानं काल अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता त्यांची खासदारकीदेखील धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या नेत्यांनीच त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

अकबर यांना भाजपानं मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पाठवलं आहे. पुढील महिन्यात मध्य प्रदेशात विधानसभेची निवडणूक आहे. अकबर यांच्यावरील आरोपांचा फटका या निवडणुकीत भाजपाला बसू शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन मध्य प्रदेशातील भाजपा नेत्यांनी अकबर यांची खासदारकी काढून घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यामध्ये राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. मात्र कारवाईचा धोका असल्यानं कोणीही माध्यमांसमोर बोलायला तयार नाही. अकबर यांची खासदारकी काढून घेण्यात यावी, अशी मागणी या नेत्यांकडून पक्ष नेतृत्त्वाकडे केली जाणार आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यावर अकबर यांना 2016 मध्ये राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. मोदींच्या मंत्रिमंडळातील आणखी एक सदस्य धर्मेंद्र प्रधान यांनादेखील मध्य प्रदेशातून खासदारकी देण्यात आली आहे. 

पंधरा महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. हे आरोप सुरू असताना अकबर परदेशात होते. भारतात परतल्यावर ते मंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र भारतात परतताच त्यांनी कायदेशीर लढा देणार असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर त्यांनी पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावादेखील दाखल केला. रमानी यांनी अकबर यांच्यावर सर्वप्रथम लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. मात्र यानंतर 19 महिला पत्रकार रमानी यांच्या बाजूनं उभ्या राहिल्या. त्यामुळे अकबर यांच्या अडचणी वाढल्या. अखेर काल त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागलेले ते मोदी सरकारमधील पहिलेच मंत्री आहेत. 
 

Web Title: metoo mj akbar may lost rajya sabha seat ahead of election in madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.