#MeToo: समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज- अंतरा गांगुली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:44 PM2018-10-27T23:44:56+5:302018-10-27T23:45:24+5:30
समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची, विचार प्रगल्भ होण्याची गरज असल्याचे मत युनिसेफच्या जेंडर एक्स्पर्ट अंतरा गांगुली व यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी व्यक्त केले.
पुणे : मागील काही वर्षांत मुले व मुली असा समाजाकडून भेद करण्याच्या विचारांमध्ये बदल होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. पण हा बदल काही भागपुरताच दिसून येतो. अजूनही देशातील काही राज्यांमध्ये मुलींना सापत्न वागणूक मिळते. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात. मुलींना संधी मिळाली तर त्या कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा पुढे जाऊ शकतात, हे सातत्याने दिसून येते. म्हणून मुलींनाही मुलांप्रमाणेच सन्मान मिळण्याची गरज आहे. त्यासाठी समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची, विचार प्रगल्भ होण्याची गरज असल्याचे मत युनिसेफच्या जेंडर एक्स्पर्ट अंतरा गांगुली व यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी व्यक्त केले. लोकमत वुमन समीटमधील ‘शाश्वत जीवन जगण्यासाठीची गुरुकिल्ली’ या दुसऱ्या सत्रामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते.
भारतात भारतातील मुला-मुलींना त्यांच्या आयुष्यामध्ये समान संधी दिली जात नाही. जैविकदृष्ट्या मुली मुलांपेक्षा अधिक सक्षम असतात. पण भारतात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जगण्याचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. मात्र मागील काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. दहा वर्षांत बालविवाहाचे प्रमाण ४७ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर आले आहे. प्राथमिक स्तरावर अनेक भागात मुलींची शाळेतील उपस्थिती कमी असते. त्यामागे विविध कारणेही आहेत. गुजरातमध्ये एका गावात शाळा दूर असल्याने मुलींना जाता येत नव्हते. म्हणून मुलांनीच पुढाकार घेत मुली शाळेत गेल्या नाहीतस तर आम्हीही जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती, हे सकारात्मक चित्र आहे. मुलींप्रमाणेच मुलांवरही लैंगिक अत्याचार होतात. हे अत्याचार करणारे पुरुषच असतात. पण ‘मीटू’मध्ये काही पुरुषांनीही आपली कैफियत मांडली आहे. अनेक पुरुष याबाबत बोलत नाहीत. त्यासाठी समाजाने आपला दृष्टिकोन बदलायला हवा.
- अंतरा गांगुली
बांधकाम क्षेत्र हे महिलांसाठी नाही, असे महिलांना वाटते. पण आत्मविश्वास असेल तर महिला कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. माझे वडील बांधकाम क्षेत्रात असताना आजीने मलाही विरोध केला होता. लग्नानंतर पतीच्या व्यवसायातही सुरुवातीला अडचणी आल्या. पण हे तर आपले लहानपणापासूनचे स्वप्न असून त्याच्याकडे पाठ फिरवायची नाही, असे निश्चित करून पुन्हा काम सुरू केले. एक मालक म्हणून नव्हे, तर विद्यार्थी बनून कामात प्रगती करीत गेले. ‘गुड टच बॅड टच’ या मोहिमेअंतर्गत सुमारे इयत्ता आठवीच्या अडीच लाखांहून अधिक मुला-मुलींना याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. पुढील वर्षी हा आकडा सहा लाखांच्या पुढे जाईल. हे प्रशिक्षण देत असताना शेवटी काही मुली आपल्या झालेल्या अत्याचाराची माहिती देत होत्या. अनेक घटनांमध्ये कुटुंबातील व्यक्तीच अत्याचारी होते. पण त्यामध्ये घरातील लोकच अशा घटना पुढे येऊ देत नसल्याचे अनुभवही आले. अनेक प्रकरणांमध्ये तर खूप भयानक प्रसंग मुलींकडून सांगितले जातात.
- उषा काकडे
देशामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात. हे केवळ मुलींसोबत नाही तर मुलांसोबतही होते. तसेच लैंगिक अत्याचाराची समस्या माध्यमे, राजकारण यांसह सर्व क्षेत्रांमध्ये आहे. ही एक मानसिक विकृती आहे. जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत अशा घटना घडत राहतील. त्यासाठी समाजातील सर्वच घटकांना पुढे यायला हवे.
- विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड