#MeToo: अखेर केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 04:58 PM2018-10-17T16:58:45+5:302018-10-17T17:08:29+5:30
अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने अडचणीत सापडलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नवी दिल्ली - अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने अडचणीत सापडलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार प्रिया रमानी यांनी सर्वप्रथम अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. तेव्हापासून अकबर यांच्यावर आतापर्यंत 15 महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. एम. जे. अकबर यांनी रमानी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. मात्र रमानी यांना 19 महिला पत्रकारांनी पाठिंबा दर्शव अकबर यांच्याविरोधात न्यायालयात साक्ष देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अकबर यांच्या अडचणीत वाढ झाली होती.
#MJAkbar resigns from his post of Minister of State External Affairs MEA. pic.twitter.com/dxf4EtFl5P
— ANI (@ANI) October 17, 2018
मी टू चळवळीत महिलांनी केलेल्या आरोपांनंतर अकबर मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे म्हटले जात होते. काँग्रेस, माकपासह अनेकांनी अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पंतप्रधान मोदी अकबर यांचा दौऱ्यावरून परतताच राजीनामा घेतील, असेही बोलले जात होते. मात्र अकबर यांनी परदेश दौऱ्यातून माघारी परतल्यावर राजीनामा देण्याऐवजी संबंधित महिलांवर कायदेशीर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यासाठी त्यांनी 97 वकिलांची फौजही उभी केली होती. मात्र अखेर अकबर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.
अकबर यांच्यावर 15 आतापर्यंत महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. पत्रकार प्रिया रमानी यांनी सर्वप्रथम अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. दरम्यान, रमानी यांच्या समर्थनार्थ पुढ आलेल्या 19 महिलांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. रमानी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात आपल्याला साक्ष देण्याची संधी दिली जावी, अशी मागणी त्यांनी यातून केली आहे. 'रमानी या संघर्षात एकटी नाही. न्यायालयानं मानहानीच्या खटल्यात आमची साक्ष नोंदवावी. आमच्यातील काहीजणी लैंगिक अत्याचाराच्या साक्षीदार आहेत,' असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. यावर सर्व 19 महिलांची स्वाक्षरी आहे. निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये मीनल बघेल, मनीषा पांडे, तुषिता पटेल, कणिका गहलोत, सुपर्णा शर्मा, रमोला तलवार बादाम, होइहनु होजेल, आएशा खान, कुशलरानी गुलाब, कनीजा गजारी, मालविका बॅनर्जी, ए. टी. जयंती, हामिदा पार्कर, जोनाली बुरागोहेन, मीनाक्षी कुमार, सुजाता दत्ता सचदेवा, रेशमी चक्रवाती, किरण मनराल आणि संजरी चॅटर्जी यांचा समावेश आहे. याशिवाय डेक्कन क्रोनिकलच्या पत्रकार क्रिस्टिना फ्रान्सिस यांनीदेखील या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.