#MeToo: रमानी यांना 19 महिलांचा पाठिंबा; अकबर यांच्या विरोधात साक्ष देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 08:33 AM2018-10-17T08:33:49+5:302018-10-17T08:36:45+5:30
एम. जे. अकबर यांच्यावर आतापर्यंत 15 महिलांचे आरोप
नवी दिल्ली: लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले केंद्रीय राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्रकार प्रिया रमानी यांनी सर्वप्रथम अकबर यांनी केलेल्या अत्याचाराचा वाचा फोडली. त्यानंतर अकबर यांनी रमानी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला. आता रमानी यांना 19 महिला पत्रकारांनी पाठिंबा दर्शवला. या 19 महिला पत्रकार अकबर यांच्याविरोधात न्यायालयात साक्ष देणार आहेत. या प्रकरणी उद्या पटियाला उच्च न्यायालयात पहिली सुनावणी होणार आहे.
अकबर यांच्यावर 15 आतापर्यंत महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. पत्रकार प्रिया रमानी यांनी सर्वप्रथम अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यांच्याविरोधात अकबर यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. अकबर यांचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी करांजवाला अँड कंपनी ही लॉ फॉर्म मैदानात उतरणार आहे. मात्र त्याआधीच अकबर यांना मोठा धक्का बसला आहे. रमानी यांना 19 महिला कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. या सर्व महिला ‘द एशियन एज’च्या माजी कर्मचारी आहेत.
रमानी यांच्या समर्थनार्थ पुढ आलेल्या 19 महिलांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. रमानी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात आपल्याला साक्ष देण्याची संधी दिली जावी, अशी मागणी त्यांनी यातून केली आहे. 'रमानी या संघर्षात एकटी नाही. न्यायालयानं मानहानीच्या खटल्यात आमची साक्ष नोंदवावी. आमच्यातील काहीजणी लैंगिक अत्याचाराच्या साक्षीदार आहेत,' असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. यावर सर्व 19 महिलांची स्वाक्षरी आहे. निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये मीनल बघेल, मनीषा पांडे, तुषिता पटेल, कणिका गहलोत, सुपर्णा शर्मा, रमोला तलवार बादाम, होइहनु होजेल, आएशा खान, कुशलरानी गुलाब, कनीजा गजारी, मालविका बॅनर्जी, ए. टी. जयंती, हामिदा पार्कर, जोनाली बुरागोहेन, मीनाक्षी कुमार, सुजाता दत्ता सचदेवा, रेशमी चक्रवाती, किरण मनराल आणि संजरी चॅटर्जी यांचा समावेश आहे. याशिवाय डेक्कन क्रोनिकलच्या पत्रकार क्रिस्टिना फ्रान्सिस यांनीदेखील या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.