दिल्लीत महिलांना मेट्रो, बस प्रवास मोफत; आपची नवी योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 03:33 AM2019-06-03T03:33:57+5:302019-06-03T03:34:21+5:30
पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेणार निर्णय
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत महिलांना मेट्रो व बस प्रवास मोफत करण्याचा आम आदमी पार्टीचा विचार असून, याद्वारे महिलांना सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. पुढील वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होत असून, त्याच्या तोंडावर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
एका जाहीर सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्ली परिवहन महामंडळाच्या बसमध्ये व मेट्रोमध्ये महिलांना मोफत प्रवास देणारी योजना आणण्यात येईल. याबाबत ३ जून रोजी घोषणा करण्यात येणार आहे. दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, दिल्लीचे वाहतूकमंत्री कैलाश गेहलोत यांनी या योजनेचा सर्व बाजूंनी विचार करण्यासाठी बैठकीच्या अनेक फेºया पूर्ण केलेल्या आहेत.
बसमध्ये मोफत प्रवास योजना लागू करणे अवघड नाही; परंतु मेट्रोमध्ये अशी योजना आणणे आव्हानात्मक काम आहे. कारण मेट्रोमध्ये दिल्ली सरकार व केंद्राचा ५०-५० टक्के वाटा आहे. आधीच मेट्रोबाबत केंद्र व राज्य सरकारमध्ये भाडेवाढ, चौथ्या टप्प्याचे काम अशा अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. त्यात पुन्हा या वादाची भर पडणार आहे. त्यामुळे तांत्रिक व आर्थिक मुद्यांवर मेट्रोमध्ये महिलांना मोफत प्रवास देणे सोपे दिसत नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.
विजेचा फिक्स्ड चार्ज कमी करणार
वीज बिलातील फिक्स्ड चार्ज कमी करण्यासाठी दिल्ली सरकार दिल्ली विद्युत नियामक आयोगाशी चर्चा करीत आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले. मागील वर्षी आयोगाने दिल्ली सरकारशी विचारविनिमय न करताच फिक्स्ड चार्ज वाढवला होता. पुढील महिन्यात नवीन शुल्क निर्धारित करण्यात येणार आहे. हा दर पूर्वीच्या स्तरावर आणण्याचे आमचे प्रयत्न असून, आयोग यावर सहमत होण्याची शक्यता आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.