'बुलेट ट्रेन फक्त श्रीमंतांसाठी, सर्वसामान्यांसाठी सुरक्षित रेल्वे व्यवस्था गरजेची'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 08:31 PM2018-07-01T20:31:33+5:302018-07-01T20:32:30+5:30
भारतीय रेल्वे सेवेवर 'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन यांचं परखड भाष्य
नवी दिल्ली: बुलेट ट्रेन फक्त श्रीमंतांसाठी आहे. देशातील सर्वसामान्य माणसाला सुरक्षित रेल्वे व्यवस्था पुरवणं गरजेचं आहे, असं मत 'मेट्रो मॅन' म्हणून संपूर्ण देशाला सुपरिचित असणाऱ्या ई. श्रीधरन यांनी व्यक्त केलं. बुलेट ट्रेन अतिशय महाग असल्यानं ती सामान्य माणसाला परवडणारी नाही, असं 86 वर्षांच्या श्रीधरन यांनी म्हटलं. देशाला आता बुलेट ट्रेनची नव्हे, तर स्वच्छ, सुरक्षित आणि वेगवान रेल्वे व्यवस्थेची आवश्यकता आहे, असं ते म्हणाले. 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत 'मेट्रो मॅन' श्रीधरन यांनी देशातील रेल्वे सेवेबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं.
भारतीय रेल्वेत झालेल्या बदलांबद्दल प्रश्न विचारल्यावर श्रीधरन यांनी त्यांचे परखड विचार मांडले. 'रेल्वेतील बायो टॉयलेट्सचा विचार केल्यास त्यामध्ये अनेक तांत्रिक सुधारणा व्हायच्या आहेत. रेल्वे गाड्यांचा वेग वाढलेला नाही. उलट प्रमुख गाड्यांचा वेग कमी झाला आहे. रेल्वे गाड्या वेळेवर येणं, त्या वेळापत्रकानुसार धावणं, हे आजही आपल्यासाठी मोठं आव्हान आहे. रेल्वे अपघातांची संख्या कमी झालेली नाही. लेव्हल क्रॉसिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,' असं म्हणत श्रीधरन यांनी रेल्वे विभागाच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवला.
विकसित देशांमधील रेल्वे सेवांचा विचार केल्यास भारतीय रेल्वे तब्बल 20 वर्ष मागे असल्याचं श्रीधरन म्हणाले. 'देशाच्या विकासाच्या वेगाबद्दल मी अतिशय उत्सुक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांचा कालावधी लोटला. तरीही देशाची एक तृतीयांश लोकसंख्या अद्यापही दारिद्र्य रेषेखाली आहे. राजकीय नेत्यांना स्वत:चं राजकीय लक्ष्य गाठण्यात जास्त स्वारस्य आहे,' अशा शब्दांमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं.