महिलांच्या मोफत मेट्रो प्रवासाला 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 09:39 AM2019-06-15T09:39:02+5:302019-06-15T09:49:53+5:30
दिल्लीत मेट्रो आणि बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आपच्या या प्रस्तावित योजनेला 'मेट्रो मॅन' अशी ओळख असलेल्या ई श्रीधरन यांनी विरोध दर्शवला आहे.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मास्टरस्ट्रोक मारला. दिल्लीत मेट्रो आणि बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आपच्या या प्रस्तावित योजनेला 'मेट्रो मॅन' अशी ओळख असलेल्या ई श्रीधरन यांनी विरोध दर्शवला आहे. ई श्रीधरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं असून या प्रस्तावाला विरोध करावा असं आवाहन केलं आहे.
'सर, मी तुम्हाला विनंती करतो, महिलांना मेट्रोत मोफत प्रवास करण्याच्या दिल्ली सरकारच्या प्रस्तावाला तुम्ही मान्यता देऊ नये. जर दिल्ली सरकारला मेट्रोतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची काळजी आहे तर त्यांनी थेट प्रवासासाठी लागणारे पैसे त्या महिलांच्या खात्यात जमा करावेत' असं ई श्रीधरन यांनी मोदींना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.
ई श्रीधरन यांनी दिल्ली सरकारने महिलांना प्रवासात सूट दिली तर इतर राज्यातील मेट्रोसाठीही धोक्याची घंटा असेल असं म्हटलं आहे. तसेच 2002 मध्ये दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली तेव्हाच आपण कोणालाही प्रवासात सूट द्यायची नाही हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही प्रसंगी तिकीट काढूनच मेट्रोने प्रवास केला असल्याचं देखील ई श्रीधरन यांनी सांगितलं.
महिलांना मेट्रो, बस प्रवास मोफत; दिल्ली सरकारचा मोठा निर्णय
अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी महिलांना मेट्रो व बस प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. दिल्लीत महिलांना असुरक्षित वाटते. महिलांच्या सुरक्षेतेसाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्ली सरकारने दिल्ली मेट्रो आणि डीटीसी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, महिलांच्या मोफत प्रवासामुळे डीएमआरसीचे होणारे नुकसान दिल्ली सरकार भरुन काढेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. याचबरोबर, येत्या दोन ते तीन महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय, दिल्लीतील सक्षम महिला, त्यांना वाटल्यास तिकिट काढू शकतात. मात्र, त्यांना सब्सिडीचा वापर न करण्यासाठी प्रेरित करण्यात येईल, असेही यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. मेट्रोमध्ये दिल्ली सरकार व केंद्राचा 50-50 टक्के वाटा आहे. त्यामुळे केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज आहे की, असे विचारले असता अरविंद केजरीवाल यांनी यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. दिल्ली सरकार सब्सिडी देत असून याचा खर्च सुद्धा दिल्ली सरकार देणार असल्याचं सांगितलं होतं.
'बुलेट ट्रेन फक्त श्रीमंतांसाठी, सर्वसामान्यांसाठी सुरक्षित रेल्वे व्यवस्था गरजेची'
बुलेट ट्रेन फक्त श्रीमंतांसाठी आहे. देशातील सर्वसामान्य माणसाला सुरक्षित रेल्वे व्यवस्था पुरवणं गरजेचं आहे, असं मत 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांनी याआधी व्यक्त केलं होतं. बुलेट ट्रेन अतिशय महाग असल्यानं ती सामान्य माणसाला परवडणारी नाही, असं 86 वर्षांच्या श्रीधरन यांनी म्हटलं होतं. देशाला आता बुलेट ट्रेनची नव्हे, तर स्वच्छ, सुरक्षित आणि वेगवान रेल्वे व्यवस्थेची आवश्यकता आहे, असं ते म्हणाले. 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत 'मेट्रो मॅन' श्रीधरन यांनी देशातील रेल्वे सेवेबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं होतं. भारतीय रेल्वेत झालेल्या बदलांबद्दल प्रश्न विचारल्यावर श्रीधरन यांनी त्यांचे परखड विचार मांडले होते. 'रेल्वेतील बायो टॉयलेट्सचा विचार केल्यास त्यामध्ये अनेक तांत्रिक सुधारणा व्हायच्या आहेत. रेल्वे गाड्यांचा वेग वाढलेला नाही. उलट प्रमुख गाड्यांचा वेग कमी झाला आहे. रेल्वे गाड्या वेळेवर येणं, त्या वेळापत्रकानुसार धावणं, हे आजही आपल्यासाठी मोठं आव्हान आहे. रेल्वे अपघातांची संख्या कमी झालेली नाही. लेव्हल क्रॉसिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,' असं म्हणत श्रीधरन यांनी रेल्वे विभागाच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवला होता.